जालचावड्या - नियम, उत्कर्ष, पतन  

Posted by Milind Phanse in , , ,

आज सकाळी सहज जालभटकंती करताना Community Spark ही जाल-चावड्या या विषयास वाहिलेली एक जालनिशी सापडली. त्यातील काही नोंदींचे दुवे असे :
१) नियमांचे महत्त्व
२) चावडी अडखळू लागल्याचे इशारे

लेखक मार्टीन रीड पहिल्या नोंदीत स्पष्ट, जाहीर व लिखित नियमांचे महत्त्व विशद करतो. तो असेही म्हणतो की नियम लांबलचक व गुंतागुंतीचे नसावे. नियम स्पष्ट नसल्यास सदस्यांना कधी कधी मॉडरेशन पटत नाही कारण मुळात काय चूक झाली आहे हेच त्यांना कळत नाही. त्याच प्रमाणे मॉडरेटर/चावडीमालकाच्या नक्की अपेक्षा काय आहेत याचाही त्यांना अंदाज येत नाही. दुसऱ्या नोंदीत चावडीची वाटचाल अडखळू लागल्याचे काही धोक्याचे इशारे दिलेले आहेत. नवीन सदस्य न येणे, नवीन सदस्यांचे स्वागत न होणे, नव्या नोंदींची संख्या घटत जाणे, नोंदींना प्रतिसाद न येणे/चर्चा न रंगणे, इत्यादी.

मराठी जाल-चावड्यांची संख्या अद्याप बरीच मर्यादित आहे. वर मांडलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने विचार करायचा झाल्यास काही अनेक वर्षे यशस्विरीत्या चालल्या आहेत, काही यशाचे शिखर (मराठी जालविश्वाची व्याप्ती लक्षात घेता ही शिखरेही टेकड्यांचीच म्हणावी लागतील) गाठून आता उतरणीला लागलेल्या आहेत, काहींचे पुस्तक आटोपले आहे व काही सध्या यशाच्या पताका हाती घेऊन ऐन भरात आहेत. परंतु नियम या विषयी एकुणात , उपक्रमचा सन्माननीय अपवाद वगळता, बहुतेकांची भूमिका "लेटस् क्रॉस दॅट ब्रिज व्हेन वुई कम टू इट" अशाच स्वरूपाची राहिली आहे. या 'आग लागली की विहीर खणू' वृत्तीमुळे अनेक टाळता येण्याजोगे गैरसमज व वाद होतात, कटुता निर्माण होते. सगळे घडून गेल्यावर नियम बनवले जातात पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. मनोगत वर तर नियम व मॉडरेटर्सची नावे गुलदस्त्यातच असतात - पटत असेल तर या नाहीतर आपला रस्ता सुधारा ! यामुळे सदस्य मात्र एकमेकांकडे संशयाने पाहत असतात. 'हा/हीच तर मॉडरेटर नसेल? यानेच/हिनेच तर माझा पोस्ट/प्रतिसाद उडवला नसेल? हा/ही नक्कीच प्रशासकाच्या आतल्या गोटातील असणार...' वातावरण हे असे! मॉडरेटरांची नावे दडवण्यात काय फायदा होतो हे मला आजतागायत न उलगडलेले कोडे आहे. असो. "तुका म्हणे उगी राहावे, जे जे घडेल ते ते पाहावे..."


ता.क. हा चर्चा-प्रस्ताव मनोगतच्या प्रशासकांनी प्रकाशित केला नाही.

This entry was posted on Saturday, March 01, 2008 at Saturday, March 01, 2008 and is filed under , , , . You can follow any responses to this entry through the comments feed .

0 comments

Post a Comment