नटरंग - एक विसंवादी सूर  

Posted by मिलिंद / Milind in , ,

नटरंग हा चित्रपट मी काही दिवसांपूर्वी पाहिला. चित्रपट पाहात असतानाच हळूहळू अपेक्षाभंगाची भावना मनात दाटू लागली. आधी वाटलं की चित्रपटाच्या केलेल्या वारेमाप प्रसिद्धीमुळे माझ्याच अपेक्षा अवास्तव वाढल्या असाव्यात व म्हणून असे झाले असावे. त्यामुळे घाईत कुठेही प्रतिक्रिया नोंदवली नही. पण काही दिवस उलटून गेल्यानंतर, व शांतपणे विचार केल्यानंतरही मत न बदलल्यामुळे आता ते मांडत आहे. सुरुवातीलाच सांगतो की ज्यावर नटरंग आधारित आहे ती मूळ कादंबरी मी वाचलेली नाही, त्यामुळे माझी मते केवळ चित्रपटाविषयी व त्यात जाणवलेल्या त्रुटींविषयी आहेत.

पहिला मुद्दा गाण्यांचा. एक 'वाजले की बारा'चा अपवाद सोडल्यास, बाकीची गाणी ठीकच वाटली. जर ती झी मराठी वाहिनीने गेले ४-६ महिने सतत वाजवली नसती, 'हॅमर' केली नसती तर ती फारशी कोणाच्या खिजगणतीतही नसती. त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने चांगली अनेक गाणी मराठी चित्रपटांत व गैरफिल्मी आल्बम्समध्ये येऊनही प्रसिद्धीअभावी आपल्यापर्यंत पोहोचतच नाहीत. 'झी'चे आर्थिक पाठबळ व घरच्या वाहिन्या, ह्यामुळे नटरंगला खूप फायदा झालेला आहे. उदाहरण द्यायचं असल्यास 'वाजले की बारा' व 'अप्सरा आऽली' ह्या लावण्या 'दे धक्का'मधील 'उगवली शुक्राची चांदणी' पेक्षा शब्द, अर्थ, संगीत बाबत निश्चित डाव्या आहेत.

काही प्रसंग न पटण्यासारखे, अतार्किक वाटले. नयना ह्या पात्राला गुणा हा देखणा, पैलवान गडी दिसताक्षणीच आवडू लागलेला असतो हे शब्दांतून नसलं तरी तिच्या डोळ्यांतून, हावभावांतून, देहबोलीतून दिग्दर्शकाने सूचित केलेलं आहे. ती एक नैतिकतेची विशेष चाड नसलेली तमासगिरीण आहे हेही उघड आहे. ज्या मर्दानी, आकर्षक पुरुषाची तिला शारीर ओढ आहे त्याला ती कमावलेलं शरीर उतरवून नाच्या व्हायला सांगेल हे पटत नाही. बरं, तमाशात नाच्या हवाच ही तिचीच अट आहे, गुणा किंवा इतरांना त्याची गरज वाटत नसते. दुसरा कोणीही नाच्या होण्यास तयार नसल्यामुळे नाईलाजाने गुणा स्वतः नाच्या होण्याचा निर्णय घेतो. ह्या वेळी त्याच्यावर अनुरक्त असलेली नयना त्याला थांबवू शकते, आपला हट्ट सोडू शकते. अशा परिस्थितीत कोणतीही हाडामांसाची स्त्री तसेच करेल. पण नयना तसे करत नाही ही केवळ कादंबरीकाराची/दिग्दर्शकाची गरज असावी. ह्यात पात्राची अपरिहार्यता नाही.

शिंदे ह्या राजकारण्याकडून जत्रेतील कार्यक्रमाची सुपारी मिळवण्याचा प्रसंगही असाच अजब. सत्तास्थानी असलेल्या पुरुषाकडून आपलं काम करून घेण्यासाठी, त्याची विकेट घेण्यासाठी तमाशाचा व्यवस्थापक तमाशातील तारुण्यसंपन्न, नखरेल रूपगर्वितेला पुढे करेल की नाच्याला? शिंदे हा समलिंगी प्रवृत्तीचा असल्याची कोणतीही चिन्हं चित्रपटात नव्हती. मग त्याला पटवण्यासाठी, लाडे लाडे बोलण्यासाठी नयनाला (किंवा दुसऱ्या एखाद्या मुलीला) पुढे करण्याऐवजी नाच्याला वापरण्याचे काय प्रयोजन?

गुणा दुसर्‍यांदा फड उभारायला निघाल्यानंतरच्या त्याच्या आयुष्याच्या प्रवासाची कहाणी तर दोन-चार मिनिटात चटावरचं श्राद्ध उरकावं तशी उरकली आहे. हा माणूस म्हातारपणी जीवन-गौरव पुरस्कार मिळवण्याइतपत मोठा कसा झाला हे प्रेक्षकांना कळतच नाही. मुळात, त्याआधी गुणाला लिहिताना, तालिमी घेताना जेव्हा जेव्हा दाखवले आहे तेव्हा त्याच्या वग-लेखनात अजिबात चमक दिसत नाही. हा पुढे जाऊन तमाशाच्या क्षेत्रातील दादू इंदुलीकर प्रभृती दिग्गजांच्या पंक्तीत स्थान मिळवेल, अशी पुसटशी शंकाही येत नाही. सुरुवातीला सगळेच कच्चे, नवशिके असतात हे मान्य पण अंगभूत प्रतिभा जरा तरी दिसायला नको? पैलू पाडण्याआधीही हिरा हिराच असतो, त्याच्यात व सामान्य दगडात काही फरक असतोच. पैलू पाडल्यानंतर तो अधिक चमकतो, सुंदर दिसतो इतकंच. गुणाच्या बाबतीत असे काही अजिबात वाटत नाही. इथे लेखक, पटकथाकार कमी पडले आहेत असे वाटते.

आपल्या अभिनयाच्या जोरावर नट-नट्यांनी दिग्दर्शकास व चित्रपटास तारून नेले आहे. अतुल कुलकर्णी ह्यांची अभिनयक्षमता वादातीत आहे, व ती त्यांनी ह्याआधीही सिद्ध केलेली आहे. त्यांनी ह्या चित्रपटात लौकिकास साजेसा अभिनय केलेला आहे, गुणाची दोन्ही रूपं जिवंत केलेली आहेत. मात्र खूप प्रयत्न करूनही अनेक ठिकाणी उच्चारात त्यांच्यातील 'कुलकर्णी' लपू शकलेला नाही. सोनाली कुलकर्णींनी अभिनय व नृत्य दोन्ही अप्रतिम केले आहे. नृत्य-दिग्दर्शिकेने बसवलेली नृत्यं खरं तर 'ठीक' पलीकडे फारशी जात नाहीत पण सोनाली कुलकर्णींनी त्यांतही प्राण फुंकून जिवंत केली आहेत. तिच्या पहिल्या प्रवेशात जत्रेत ती जो उत्स्फूर्त नाच करत असते तोच सर्वाधिक भावतो. 'अप्सरा आऽली' मधील काही झटके तर विजेचा झटका लागून झाल्यागत भासतात. अमृता खानविलकरचे 'वाजले की बारा' नाचापेक्षा गाण्यामुळेच गाजले. खानविलकरांना तो 'गेट-अप' फारसा शोभून दिसत नव्हता. त्यात त्यांच्या केशभूषेचा जो प्रकार केला तो पाहून शर्मिला टागोर ह्यांची आठवण झाली. डोक्याच्या मागच्या भागावर एखादा मोठा वाडगा उपडा ठेवून त्यावर एक भन्नाट टोप ठेवला असावा. गुणाची पत्नी झालेल्या नटीने (? विभावरी देशपांडे) आपली छोटी भूमिका परिणामकारकपणे वठवली आहे. किशोर कदम हा गुणी नट मात्र हळूहळू दिलीप कुमार, निळू फुले, नाना पाटेकर ह्यांचा कित्ता गिरवू लागला आहे हे पाहून वाईट वाटले. हे ताकदीचे नट जसे आपापल्या कारकीर्दीच्या उत्तरार्धात बहुतेक चित्रपटांत (मोजके व सन्माननीय अपवाद वगळता) अनुक्रमे दिलीप कुमार, झेले अण्णा/निळू फुले, व नाना पाटेकरच असायचे त्याचप्रमाणे किशोर कदमही आता बहुतेक चित्रपटांत व दूरदर्शनवरील मालिकांमध्ये किशोर कदमच असतात. असे करून ते स्वतः:च्या अभिनयगुणांवर, प्रतिभेवर अन्याय करत आहेत ह्याचे दु:ख आहे. ज्याचा अभिनय मुळातच सुमार असेल त्याच्याबद्दल काय व कशाला तक्रार करायची? भारत भूषण सारख्या महान चित्रपटकर्मींनी (नट म्हणावयास जीभ रेटत नाही) संपूर्ण कारकीर्द चेहर्‍याची इस्त्री बिघडू न देता काढली ह्याबद्दल आम्ही तक्रार केली का? किंबहुना 'अभिनया'त कमालीचं सातत्य राखल्याबद्दल कुठेतरी त्यांचं कौतुकच वाटत राहिलं.

शेवटी राहून राहून मनात पुन्हा पहिलाच विचार येतो. जर ह्या चित्रपटाची एवढी अतिशयोक्त प्रसिद्धी केली गेली नसती तर मी इतक्या छिद्रान्वेषी नजरेने त्याकडे पाहिले असते का? नक्की माहीत नाही. कदाचित मी तो चित्रपट पाहिलाही नसता. पण पाहिला असता तर वर मांडलेल्यापेक्षा काही वेगळी प्रतिक्रिया असती असं मला नाही वाटत.

गूगल वेव  

Posted by मिलिंद / Milind in ,

आजच मला गूगल वेवचे सदस्यत्व मिळाले. गूगलने कार्यान्वित केलेले हे एक नवे संपर्क साधन आहे जे एकाच वेळी अनेकांना जालावर डॉक्युमेन्टसविषयी चर्चाही करू देते व संपादनही. ते एक "document collaboration tool" तर आहेच पण त्याचबरोबर गूगलच्या म्हणण्यानुसार चाळीस वर्षांपूर्वी जन्माला आलेल्या ई-मेलची निर्मिती जर आज झाली असती तर ती अशी दिसली असती. गूगल वेवविषयी अधिक माहिती इथे मिळेल व इथे मिळेल.
सध्या वेवशी तोंडओळख करून घेणे सुरू आहे. परंतु माझ्या गूगल कॉन्टॅक्टस्‌पैकी कोणाकडेही अजून गूगल वेव नसावे असे दिसते. (कारण असते तर ते आपोआप मला माझ्या वेव कॉन्टॅक्टस्‌मध्ये दिसले असते. निदान गूगलबाबा तरी असे म्हणतो.) हे म्हणजे आपल्याकडे दूरध्वनी असताना आपल्या परिचयाच्या एकाही व्यक्तीकडे तो नसावा असे काहीसे झाले. वेविंग करायचे कोणासोबत?(चॅटिंगच्या धर्तीवर हेही क्रियापद मराठी जालविश्वात रूढ होण्याआधीच आपण त्याऐवजी 'वेवणे' हा शब्द घडवून मायमराठीस बहाल करुया का? उदा., "मी काल 'क्ष' आणि 'य' बरोबर वेवलो", "आपण संध्याकाळी सातला वेवुया का?", "वेवल्याने होत आहे रे, आधी वेवलेची पाहिजे" इत्यादी. मग कंसाआधीच्या वाक्याचे 'वेवायचे कोणासोबत?' असे पुनर्लेखन करायला हवे.) असो. तर, मुद्दा असा की कोणीही मित्र/परिचित जोवर वेववर भेटत नाहीत तोवर खुल्या (पब्लिक) वेव्जवर ह्या नव्या पोहण्याचा सराव करावा लागणार आहे. तुमच्यापैकी कोणी जर वेववर असेल तर नक्की संपर्क साधा...

गुरुदत्त ह्यांचे न्यू यॉर्क चित्रपट महोत्सवात रिट्रॉस्पेक्टिव  

Posted by मिलिंद / Milind in ,

ह्या वर्षीच्या न्यू यॉर्क चित्रपट महोत्सवात (New York Film Festival 2009) कै. गुरूदत्त ह्या हिंदी सिनेमाच्या सुवर्णकाळातील विख्यात नट-दिग्दर्शक-निर्मात्याच्या चित्रपटांचे प्रदर्शन (रिट्रोस्पेक्टिव) NYFF Masterworks: The Films of Guru Dutt : A Heart as Big as the World ह्या शीर्षकाखाली ७ ते ११ ऑक्टोबरदरम्यान होणार आहे. ह्यात त्यांचे बाज़ी, चौदवीं का चाँद, काग़ज़ के फ़ूल, Mr. & Mrs. 55, प्यासा, आणि साहिब, बीबी और ग़ुलाम हे प्रसिद्ध चित्रपट दाखवले जाणार आहेत, त्याचबरोबर गुरुदत्त ह्यांच्या आयुष्यावर व कारकीर्दीवर नसरीन मुन्नी कबिर ह्यांनी बनवलेला "In Search of Guru Dutt" हा माहितीपटही दाखवला जाणार आहे. स्वत:च्याच देशातील हिंदी चित्रपट पाहणार्‍या आजच्या पिढीस जवळ जवळ पूर्णपणे अज्ञात असलेल्या वा त्यांच्या खिजगणतीतही नसलेल्या हा हळव्या, कविमनाच्या कलाकाराचा त्याच्या मृत्यूनंतर ४५ वर्षांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर सत्कार होत आहे.



ह्याविषयीचा वृत्तांत New York Times मध्ये इथे वाचता येईल. दुर्दैवाने आजही आपल्या देशात फिरंग्यांचे सर्टिफिकेट मिळाल्याशिवाय एखाद्याची थोरवी मान्य केली जात नाही. सत्यजीत रायसारख्या प्रतिभावंतालाही आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाल्यावरच स्वदेशी ओळख व नाव प्राप्त झाले. कदाचित गुरुदत्त ह्यांचेही भाग्य ह्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात स्थान मिळाल्यामुळे उजळेल.

डिग्स्बीपासून सावध  

Posted by मिलिंद / Milind in

डिग्स्बी हा सध्या लोकप्रिय असलेला IM (इन्स्टंट मेसेंजर) क्लायंट प्रोग्रॅम आहे. आकर्षक रूपडे असल्याने, एकाच वेळी  गूगल टॉक, याहू मेसेंजर इत्यादी बर्‍याच चॅटना जोडून देत असल्याने, आणि फुकट असल्याने डिग्स्बीचा अल्पावधीत खूप प्रसार झाला. मात्र संगणकावर स्थापण्याच्या प्रक्रियेदरम्यान हा स्वत:बरोबरच इतर तब्बल सहा क्रॅपवेअर स्थापन करण्याचा प्रयत्न करतो. ह्या विषयी माहिती इथेइथे पाहा. इन्स्टॉल करताना डिग्स्बी याहू टुलबार, मायफ्रीझ नेट असिस्टंट फॉर फायरफॉक्स, स्मार्टशॉपर, वेदरबग, रेगिस्ट्री पॉवर क्लीनर इत्यादी स्थापन करण्याच्या ’स्पेशल ऑफर’चे पर्याय देतो. आपण लक्ष न देता किंवा घाईत ’Accept' वर टिचकी मारत गेलो तर हे सारे अनावश्यक क्रॅपवेअर आपल्या संगणकावर टाकले जाईल. याहून वाईट गोष्ट म्हणजे आपल्याला अंधारात ठेवून डिग्स्बी प्रोग्रॅम आपल्या संगणकाचा CPU आणि बॅन्डविड्थ ’रिसर्च’ साठी वापरतो. ही माहिती त्यांच्या टर्म्स ऑफ सर्विस मध्ये दडवलेली आहे. किती जण TOS वाचतात? ह्या ’रिसर्च’मध्ये मार्केटिंग रिसर्चही अंतर्भूत आहे, व TOS मध्ये  "...including but not limited to..." ची पळवाट ठेवलेली आहेच, जेणेकरून त्यांना तुमच्या बॅन्डविड्थचा उपयोग अक्षरश: कशासाठीही करता येईल. आपला संगणक आपल्या परवानगीशिवाय, आपल्याला न कळवता कोणीतरी वापरत आहे किंवा वापरू शकतो ही कल्पना किती भयावह आहे! हा अनधिकृत वापर तुम्हाला बंद करायचा असल्यास मेनू मध्ये जाऊन ’डिग्स्बी’-’सपोर्ट दिग्स्बी’-’हेल्प डिग्स्बी कंडक्ट रिसर्च’ बंद करावे लागेल.
डिग्स्बी वापरणार्‍यांनी आणि वापरण्याच्या विचारात असलेल्यांनी हे कळल्यानंतर पुनर्विचार करावा आणि एखादा पर्यायी सुरक्षित प्रोग्रॅम (उदा. Pidgin ही मुक्तस्रोत प्रणाली) वापरावा.

जी-मेल मध्ये चित्र टाकणे  

Posted by मिलिंद / Milind in

आतापर्यंत जी-मेल मध्ये चित्र सहजपणे टाकता येत नव्हती. ही जी-मेलमधील एक मोठी कमतरता होती. मात्र आता गूगलने ही सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी 'सेटिंग्ज' मधील लॅब्ज ह्या टॅबवर टिचकी मारून 'इन्सर्टिंग इमेजेस' चालू करा. आता विरोपात तुम्ही स्वतःच्या संगणकावरील चित्र चढवू शकता किंवा जालावर उपलब्ध असलेल्या चित्राचा दुवा देऊ शकता. ते चित्र तुमच्या विरोपात दिसेल. अधिक माहिती इथे पाहा.

अहमद फराज - दुःखद निधन  

Posted by मिलिंद / Milind in

परवा, २५ ऑगस्ट रोजी, इस्लामाबादामध्ये आजच्या काळातील सर्वोत्तम उर्दू कवीपैकी एक, श्री. अहमद फराज ह्यांचे प्रदीर्घ आजारानंतर वयाच्या ७४व्या वर्षी दुःखद निधन झाले. फैज अहमद फैज ह्यांचा वारसा सांगणाऱ्या फराज ह्यांचेही फैजप्रमाणेच पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांशी कधीच पटले नाही. रिवायती रोमँटिक गझलांसाठी प्रसिद्ध असलेल्या ह्या शायराने पाकिस्तानातील राजकीय स्थितीवर व तेथील हुकूमशहांनी सामान्य माणसांच्या केलेल्या गळचेपीवर देखील अनेक कविता केल्या. (ह्याचे उत्तम उदाहरण आहे त्यांची कविता मोहासर). त्यामुळे त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. काही वर्षे देशत्याग करून युरोप, इंग्लंड व कॅनडात राहावे लागले. त्यांच्या काही प्रसिद्ध रचना आहेत :

1. रंजिशही सही, दिलही दुखाने के लिये आ
2. अब के हम बिछडे तो शायद कभी ख्वाबोंमें मिले
3. तेरी बातेंही सुनाने आये
4. कठीन है राहगुजर, थोडी दूर साथ चलो

त्यांच्या गझला व कविता इथेइथे वाचा. विकिपिडियावर त्यांचा परिचय इथे आहे.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. अल्विदा, फ़राज़साहब...

अनिल विश्वास यांचा पाचवा स्मृतिदिन  

Posted by मिलिंद / Milind in ,

हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णकाळातील एक महान संगीतकार, श्री. अनिल विश्वास, यांचा आज पाचवा स्मृतिदिन. त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन.

१९३५ साली 'बालहत्या' या चित्रपटाचे संगीतकार मधुलाल दामोदर मास्टर ह्यांचे सहायक म्हणून त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. त्याच वर्षी 'भारत की बेटी' या चित्रपटाचे संगीतकार झंडे खान यांचेही ते सहायक होते. यानंतर आला तो संगीत दिग्दर्शक म्हणून त्यांचा पहिला स्वतंत्र चित्रपट 'धर्म की देवी' (१९३५). तीस वर्षाच्या देदीप्यमान कारकीर्दीत त्यांनी जवळ-जवळ ८० चित्रपटांसाठी संगीत दिले. त्यांचा शेवटचा चित्रपट होता 'छोटी छोटी बातें' (१९६५). 'औरत' (१९४०, मदर इंडियाची मूळ आवृत्ती), 'किस्मत' (१९४३), 'गजरे', 'अनोखा प्यार' (१९४८), 'लाडली', 'जीत', 'गर्ल्स् स्कूल' (१९४९), 'तराना', 'आराम' (१९५१), 'दो राहा' (१९५२), 'वारिस' (१९५४), 'जलती निशानी' (१९५५) या चित्रपटांचे संगीत त्यांच्या उत्तुंग प्रतिभेची साक्ष देते. मुकेश व तलत महमूद या गायकांना पुढे आणण्यात अनिल विश्वास यांचा मोलाचा वाटा होता. दूरदर्शनवरील आद्य महामालिका, 'हम लोग', हिचे संगीतही अनिल विश्वास यांचे.
आजच्या ( व कालच्याही) पिढीतील फारसे कोणी अनिल विश्वास हे नाव ऐकले नसले तरी एके काळी हिंदी सिने-संगीताच्या क्षेत्रात त्यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जायचे. सार्वजनिक कार्यक्रमात ते शेवटचे दिसले ते काही वर्षांपूर्वी झी टीव्हीच्या 'सा रे ग म' स्पर्धेचे माननीय परीक्षक म्हणून. (तेव्हा या वाहिन्या होतकरू गायकांची गुणवत्ता SMSची द्रव्यरूपी संख्या मोजून न ठरवता पंडित जसराज, अनिल विश्वास, ओ. पी. नय्यर, इत्यादी दिग्गजांकडून पारखून घ्यायच्या.)