Showing posts with label petrichor. Show all posts
Showing posts with label petrichor. Show all posts

Sunday, May 16, 2010

मृद्गंध

      मृद्गंध - पावसाच्या पहिल्या सरी पडताच वैशाख-वणव्याने तापलेल्या कोरड्या मातीतून येणारा, आसमंतात दरवळणारा हवाहवासा सुवास. आयुष्यभर ह्या मृद्गंधाचा सुखद अनुभव घेतला पण "मातीच्या गंधाने भरला गगनाचा गाभारा" अशा लालित्यपूर्ण कल्पनांच्या पलिकडे जाऊन कधी त्याविषयी विचार केला नाही.
     आज सहज जालभ्रमण करताना समजलं की पावसामुळे कोरड्या मातीतून येणार्‍या ह्या वासाला इंग्रजीत पेट्रेकॉर (petrichor) म्हणतात. हा शब्द १९६४ साली बेअर व टॉमस ह्या दोन ऑस्ट्रेलिय संशोधकांनी पेट्रॉस ( दगड) व इकॉर (ग्रीक पौराणिक देवतांच्या धमन्यांतून वाहणारा द्रव-पदार्थ) हे दोन शब्द जोडून बनवला व ह्या विषयी Nature ह्या प्रख्यात शास्त्रीय मासिकात एक शोध-निबंध लिहिला. त्यात त्यांनी सिद्ध केले की कोरड्या मोसमात काही झाडांतून एक विशिष्ट प्रकारचे तेल स्रवते. हे तेल माती व दगडांना लिंपून राहते. पाऊस पडला की हे तेल व जिओस्मिन नावाचे एक रसायन हवेत सोडले जाते. मृद्गंध हा ह्या तेलाचा व जिओस्मिनचा वास असतो.
      ही माहिती विकिपिडियातून घेतली आहे.