Sunday, September 24, 2006

मुंगीची ओळख

मुक्ताईच्या मुंगीने सूर्यास गिळले.आमची मुंगी साखरेच्या एखाद्या कणावर भागवते. सूर्याला गिळण्यासाठी लागणारी 'अहं ब्रह्मास्मि' छाप आध्यात्मिक उंची कुठल्या मठात, कोणत्या गुरुच्या चरणी (किंवा भजनी लागल्याने) मिळते हे तिला कधी कळलेच नाही. गंगाधर गाडगीळांच्या मुंगीने 'एका मुंगीचे महाभारत' लिहिले. आमच्या मुंगीच्या आयुष्यात साहित्य हे वाण-सामानाच्या यादीतले. वर्तमानपत्राची रद्दी म्हणजे डोक्यावरून पाणी. पदवीचा कागद ज्या दिवशी हाती पडला त्या दिवशी "याचसाठी केला होता अट्टाहासऽऽऽऽऽ" असे उच्चरवात, सूर-तालाची तमा न बाळगता कॉलनीभर गात फिरली होती. साहित्य-साहित्य ते त्या कागदाच्या कपट्याहून वेगळे काय असते हा खास मराठी मध्यमवर्गीय पांढरपेशा प्रश्न तिला नेहमी पडतो. सारा वेळ आपल्यावर कोणाचा तरी पाय पडून आपण चिरडले जाऊ नये ह्याची काळजी घेण्यात गेल्यावर 'कोहम् ?' किंवा 'जगण्याचे प्रयोजन काय ?' किंवा 'आयुष्याला काही अर्थ आहे का ?' असले प्रश्न तिला सहसा सुचत नाहीत. आपल्याला चिरडू पाहणाऱ्या चार-दोघांना जाता जाता कडकडीत चावून जावे इतकेच ह्या मुंगीला कळते. साखरेचा एखादा कण मिळवण्यासाठी भिंतीवरून चढताना कितीही वेळा तोंडघशी पडली तरी जी पुन्हा उठून, अंग झटकून भिंत चढू लागते अशा एका सामान्य मुंगीची ही जालनिशी.

No comments:

Post a Comment