कालच्या (१७-०२-०८) 'लोकसत्ता'त प्रकाशित झालेला श्री. शुभानन गांगल यांचा "मराठी - एक मुक्त भाषा" हा लेख वाचून मला एक सामान्य वाचक म्हणून पडलेले काही प्रश्न, सुचलेले काही मुद्दे, व काही आक्षेप इथे चर्चेसाठी मांडत आहे.
"मराठी शुद्ध लेखनात चूक न होणारी व्यक्ती सापडणे कठीण आहे."
या वाक्यात 'शुद्धलेखनात' असे न लिहिता "शुद्ध लेखनात" असे फोड करून लिहिण्याचे प्रयोजन काय? 'शुद्धलेखन' या नामाचे 'शुद्ध लेखन' असे दोन शब्द केल्यावर वाक्याचा अर्थ बदलतो. आता 'शुद्ध' हा शब्द 'लेखन' या नामासाठी विशेषण म्हणून येतो. जे लेखन 'शुद्ध' आहे त्यात चूक असण्याचा प्रश्न कुठे येतो?
"अर्थाला नेहमीच पूर्णत्व असते. अर्धवट अर्थालाही त्या अर्थाचे पूर्णत्व लाभलेले असते."
याचा अर्थ (अर्धवट किंवा पूर्ण) काय ? जर अर्धवट अर्थालाही पूर्णत्व असेल तर तो अर्धवट कसा ? त्याला पूर्णच म्हणायला नको का ?
"सर्वांच्याच नेहमी चुका घडत असतील तर ती चूक न ठरता तोच भाषा नियम ठरतो."
सर्वांचीच नेहमी एखादी विशिष्ट चूक घडत असेल तर ती चूक न ठरता तोच भाषा नियम ठरतो असे म्हणायचे आहे का ? वेगवेगळ्या चुकांचा एक नियम ठरू शकत नाही.
"संस्कृत भाषेचे भूत त्यांच्या मानगुटीवरून उतरल्याशिवाय त्यांना मराठीचे मीपण समजणार नाही."
शुद्धलेखन व व्याकरण या तांत्रिक विषयांवरील लेखात "मराठीचे मीपण" सारखे संदिग्ध शब्दप्रयोग वाचकाला संभ्रमित करतात. जे म्हणायचे असेल ते नेमकेपणाने आणि ज्यांची व्याख्या सांगता येईल अशा शब्दांत मांडले तर मुद्देसूद चर्चा होऊ शकते. मराठीचे 'स्वतंत्र अस्तित्व' किंवा 'वेगळेपण' असे म्हटल्यास अधिक अर्थबोध होतो.
"मग त्यांनी ग्राह्य धरलेली भाषेसाठीची गृहीते कोणत्या क्षितीजापर्यंत पोहोचतील ?"
क्षितिज ह्या शब्दात 'ति' ह्रस्व असतो. शुद्धलेखनावरील लेखात तरी अशी प्राथमिक चूक होता कामा नये. 'गृहीत' ह्या विशेषणाचे (की क्रियाविशेषणाचे ?) नाम 'गृहीत' आहे की 'गृहीतक' की अजून काही ह्याविषयी जाणकारांनी खुलासा करावा.
"चुकीचे पुस्तकी व्याकरण व चुकीचे पुस्तकी लिखित नियम नावाच्या हसविणाऱ्या आरशांमधून मराठी भाषेला आज आपले विद्रूप रूप बघावे लागत आहे."
पुन्हा वरचाच शुद्धलेखनाचा मुद्दा. 'आरशांमधून' हे बहुवचन वापरायचे असेल तर 'नावाच्या' हे एकवचन अशुद्ध ठरते. त्याच्या जागी 'नावांच्या' असे हवे.
"व्याकरण व लेखननियम यातील चुका आता इतक्या वर्षांनंतर बदलायच्या ठरविल्या तर त्याचे परिणाम छापून प्रसिद्ध झालेल्या आजवरच्या पानापानांवर किती होईल, या विचारात सरकार मग्न राहील."
एकतर '...त्याचे परिणाम...किती होतील...' तरी हवे नाहीतर '...त्याचा परिणाम...किती होईल...' तरी हवे.
"...आम्ही मराठी जसे वापरत होतो तसेच ते आता अधिकृतपणे वापरता येईल..."
या वाक्यात 'मराठी' हा शब्द 'मराठी भाषा' ह्या अर्थाने (म्हणजेच एक नाम म्हणून) आला आहे, 'आम्ही' साठी वापरलेले विशेषण म्हणून नाही हे उघड आहे. पण 'मराठी' हे नाम स्त्रीलिंगी आहे त्यामुळे वरील वाक्य "...आम्ही मराठी जशी वापरत होतो तशीच ती आता अधिकृतपणे वापरता येईल..." असे हवे का ?
"जगाला अक्षर ही कल्पना मराठीच देऊ शकेल."
म्हणजे काय ?
"त्यामुळे संगणकीय क्षेत्रात मोठी क्रांती होऊ शकेल."
कशी ?
"मराठीच्या अक्षर निर्मितीचा संबंध भौतिकविज्ञान, गणित, कालमापन, भाषाविज्ञान या सर्वांशी आहे, हे कळल्यावर, मराठी भाषेला जगातील एकमेव शास्त्रीय भाषा म्हणून स्थान मिळेल."
लेखात सलग आलेली वरील तीन वाक्य शालेय वाद-विवाद स्पर्धेत टाळ्या वसूल करण्यासाठी घातलेल्या वाक्यांसारखी वाटतात. पण एका शास्त्रीय, तांत्रिक लेखात असली शेंडा-बुडखा नसलेली, कोणत्याही पुराव्याचा आधार नसलेली वाक्य शोभत नाहीत. मराठी भाषेवर गांगलांप्रमाणेच माझेही प्रेम आहे, मातृभाषेचा रास्त अभिमानही आहे. पण शेवटी अतिशयोक्ती किती करावी याला काही सुमार ? "जगातील एकमेव शास्त्रीय भाषा" ?!
"झालेल्या चुकांची कात टाकून नव्या उजळत्या कांतीने मराठीने स्वतःचा कायापालट करावा."
'उजळ' हे विशेषण असताना त्याचे 'उजळत्या' हे रूपांतर कशासाठी ? ( आणि व्याकरणाच्या दृष्टीने चूक नसले तरी एकाच वाक्यात 'कात', 'कांती' व 'काया' हे खटकतंच.)
याशिवाय 'मराठी' या विषयावरील लेखात 'हँगओव्हर', 'इलेक्ट्रॉनिक ग्राफ्स', 'इंटरनॅशनल फोनेटिक' ही इंग्रजी घुसखोरी कशासाठी ? आणि हे शब्द जर वापरायचेच तर मराठीइतकेच इंग्रजी शुद्धलेखनाकडे लक्ष द्यायला नको का? 'फोनेटिक' (एकवचन) हे इंग्रजीत विशेषण आहे. "इंटरनॅशनल फोनेटिक" याचा काय अर्थ होतो ? गांगल यांना बहुधा 'इंटरनॅशनल फोनेटिक्स्' ( बहुवचन -> नाम) असे म्हणायचे असावे.
तांत्रिक विषयांवरील लेखन हे ललित लेखनाहून अधिक काटेकोरपणे केले जावे असे मला वाटते. कालच्या 'लोकसत्ता'च्या त्याच पानावरील श्री. अरूण फडके यांचा "शुद्धलेखन - आग्रह नव्हे, सवय !" हा लेख याचे उत्तम उदाहरण आहे.
poorN sahamat!
ReplyDeleteनमस्कार,
ReplyDeleteतुमचा चर्चाप्रस्ताव वाचला, आवडला. त्यानंतर शुभानन गांगलांचा लेख काढून वाचला. तेव्हा आपल्या काही प्रश्नांची उत्तरे मला देता येतील असे वाटले.
"अर्थाला नेहमीच पूर्णत्व असते. अर्धवट अर्थालाही त्या अर्थाचे पूर्णत्व लाभलेले असते."
हे वाक्य समजून घ्यायला आधीच्या वाक्यांचा संदर्भ घ्यायला हवा.
भावना आणि विचार, यांतून साकारलेले अर्थ, व्यक्तींकडून कागदावर उतरवले जातात. वैयक्तिकदृष्ट्या त्यांनी मनातल्या अर्थाला लेखनातून पूर्णत्व दिलेले असते. पण व्याकरणकारांच्या दृष्टीने त्यात चुका असतात. अर्थाला नेहमीच पूर्णत्व असते. अर्धवट अर्थालाही त्या अर्थाचे पूर्णत्व लाभलेले असते.
असे त्यांनी म्हटले आहे. हे एखाद्या उदाहरणातून समजावून सांगता येईल-
माझ्या एक मैत्रिणीने मला एकदा एस्-एम्-एस् केला- "माय आईज हॅव कम. सर ला सांग की मी नाही." इथे तिला म्हणायचं होतं की "माझे डोळे आले आहेत. सरांना सांग की मी येणार नाही" हा पूर्ण अर्थ तिच्या मनात होता. पण तिच्या व्याकरण सांभाळून बोलण्याच्या असमर्थतेमुळे म्हणा किंवा आणखी कशामुळे म्हणा, तिला तिच्या मनातला 'पूर्ण अर्थ' व्यक्त करता आला नाही. तो अर्धवट व्यक्त झाला. तिच्यापुरता तिचा एस् एम् एस् अर्थपूर्ण होता पण व्याकरणाच्या दृष्टीने नव्हता. गांगलांच्या मते या अर्धवट अर्थालाही त्या अर्थाचं पूर्णत्व लाभलेलं असतं.
पण या उदाहरणातून मांडलेला अर्थ-अनर्थ गांगलांना अपेक्षित नाही. त्यांना अपेक्षित असलेली उदाहरणे- 'मी जातेय' 'हे कुठलं पुस्तक ए?' अशी असावीत. म्हणजे आपण बोलताना 'जाते आहे' असा पूर्ण उच्चार न करता जातेय असे म्हणतो व त्यातून आपण आपल्याला अभिप्रेत असलेला पूर्ण अर्थ व्यक्त करतो. पण असा उच्चार व्याकरणात बसत नाही. तसंच 'आहे'च्या जागी आपण 'ए' वापरतो. या अशा अधिकतम भाषकांमधे आढळून येणार्या चुका या मुळात चुका नसतातच तर त्यांचेही नियम बनवून त्यांना व्याकरणशुद्धाचा दर्जा दिला जायला हवा, असे त्यांचे म्हणणे आहे. पण ते मांडताना गांगल एक महत्वाचे उपवाक्य जोडायला विसरले आहेत. ते म्हणजे 'मराठी भाषेच्या अमुक एका बोलीभाषेतील अधिकतम भाषिकांकडून एकच चूक सातत्याने त्याच त्याच ठिकाणी होत असेल व एखाद्या नियमाच्या सहाय्याने ती 'प्रेडिक्ट' करता येणार असेल, तर ती चूक राहत नाही, ते व्याकरणशुद्ध मानले जाते. उदा.- 'आहे'हा शब्द वाक्याच्या सुरुवातीला आला, तर त्याचे 'ए'त रुपांतर होणार नाही. पण जर वाक्यात मधे किंवा शेवटी आला तर बर्याचदा होते. जसे - 'आहेस का?' हे आपण 'एस का?' असे विचारू शकत नाही पण 'वेडी आहेस का?' हा प्रश्न आपण 'वेडी एस का?' असा विचारू शकतो.
म्हणजे 'आहे'हा शब्द वाक्याच्या सुरुवातीला आला, तर त्याचे 'ए'त रुपांतर होणार नाही. पण जर वाक्यात मधे किंवा शेवटी आला तर बर्याचदा होते. असा नियम जर आपण बनवला, तर 'आहे'चा 'ए' कुठे कुठे होईल आणि कुठे कुठे होणार नाही, हे आपल्याला प्रेडिक्ट करता येईल.
असे काहीसे गांगलांना अभिप्रेत असावे.
परंतू त्यांच्या मोघम विधानांमुळे खरेच चुकीचे असलेले वाक्यप्रयोगही आपण वापरले म्हणजे व्याकरणशुद्ध होतात का असा गैरसमज होऊ शकतो. जसे इंग्रजीमधील 'माय आईज हॅव कम' हे वाक्य. जर सगळ्याच्या सगळ्या मराठी भाषकांनी इंग्रजी बोलताना हे वाक्य वापरले, तर ते व्याकरण शुद्ध होईलच असे नाही. कारण ते व्याकरण दृष्ट्या चुकीचे वाक्य हे व्याकरणात सामावून घ्यायला असलेली एक मुख्य अट म्हणजे, तो वाक्यप्रयोग जसाच्या तसा ती भाषा बोलणार्या सर्वांना कळला पाहिजे. मी जर 'वेडी एस का' असं म्हटलं तर ते सर्व मराठी भाषकांना कळणार आहे. पण मी जर ' माय आईज हॅव कम' म्हटलं तर भारतच काय, महाराष्ट्राबाहेरच्याही एकाही वाचकाला अर्थबोध होणार नाही.
त्यामुळे व्याकरणदृष्ट्या चुकीच्या वाक्याला व्याकरणात सामावून घ्यायला ते वाक्य दोन कसोट्यांवर पार पडले पाहिजे-
१- त्या वाक्याच्या प्रयोगात सातत्य असले पाहिजे व असे वाक्य कधी बनवता येईल आणि कधी नाही, याचे नियम बनवता यायला हवेत.
२- त्या वाक्याने मला जो अर्थबोध होतो, तोच प्रत्येक मराठी भाषिकाला झाला पाहिजे.
हेच एखाद्या शब्दाच्या शुद्धलेखनालाही लावता येईल. जसे plz म्हटले की please चा बोध होतो वगैरे.
शुद्धलेखन व व्याकरण या तांत्रिक विषयांवरील लेखात "मराठीचे मीपण" सारखे संदिग्ध शब्दप्रयोग वाचकाला संभ्रमित करतात.
हे तुमचे म्हणणे मला पूर्णपणे पटले. संस्कृतचा नेमका कोणत्या बाबतीतला प्रभाव त्यांना अभिप्रेत आहे हे कळतंच नाही. शब्दांच्या शुद्धलेखनाबाबत म्हणायचे झाले, तर आता नव्या नियमांनुसार, मराठी शब्द आणि तसेच संस्कृत शब्द यांच्या शुद्धलेखनात बराच फरक आहे. जसे मराठीत 'नीती' पण संस्कृतात 'नीति' वगैरे. व्याकरणाच्या दृष्टीने बघायचे झाले, तर त्याबद्दल मला काही माहित नाही.
"जगाला अक्षर ही कल्पना मराठीच देऊ शकेल."
हे मलाही कळलेलं नाही. या बाबतीतला त्यांचा मूळ मुद्दाच मला पटलेला नाही. ते संवृत्त आणि विवृत्त अक्षररचनेबद्दल बोलतात, परंतू आपल्याकडच्या (भारतीय) ध्वनिशास्त्रात या दोन्ही संज्ञांना वेगळे अर्थ आहेत. त्यामुळे त्यांनी याच दोन संज्ञा वापरायला नको होत्या असे वाटते. तो भाग जरी सोडून दिला, तरी मराठीची अक्षररचना ही मूळची विवृत्त आहे असं मला वाटत नाही. म्हणजे अक्षरचिह्नाच्या दृष्टीने पहायचे झाल्यास आहे. पण ध्वनीच्या दृष्टीने पहायचे झाल्यास नाही.
जसे- 'झाल्यास' हाच शब्द घेऊ, यात आपण स् च्या नंतर 'अ' चा उच्चार करत नाही. त्यामुळे गांगलांच्या व्याख्येप्रमाणे ध्वनिदृष्ट्या ही संवृत्त अक्षररचना आहे. पण लिहिताना आपण 'झालास्' असे लिहू शकत नाही त्यामुळे चिह्नदृष्ट्या ही विवृत्त अक्षररचना आहे. यातले गांगलांना नेमके काय अभिप्रेत आहे? इतर व्यंजनांत शब्द लिहिताना तसे लिहिले जात नाहीत म्हणून 'सत्' देखिल 'सत' असे लिहावे असे त्यांचे म्हणणे असेल, तर ते काही मला पटत नाही.
"मराठीच्या अक्षर निर्मितीचा संबंध भौतिकविज्ञान, गणित, कालमापन, भाषाविज्ञान या सर्वांशी आहे, हे कळल्यावर, मराठी भाषेला जगातील एकमेव शास्त्रीय भाषा म्हणून स्थान मिळेल."
मला वाटतं वर उल्लेखिलेली वैशिष्ट्ये ही एका मराठी भाषेची जहागिरी नसून सबंध देवनागरी लिपीची वैशिष्ट्ये आहेत. आज जर मराठी भाषा मोडी लिपीत लिहिली जात असती, तर या विधानाला काय अर्थ उरला असता?
this appears to be a prime example of trichotomy. i envy you and ms archana the surfeit of leisure you both individually and severally seem to enjoy
ReplyDelete