कार्ल बर्नस्टाइन ह्यांच्या "धी इडियट कल्चर”(१९९२) ह्या लेखाचा अनुवाद
अनुवादकाची नोंद : १९९२ साली कार्ल बर्नस्टाइनने रेखाटलेले अमेरिकी वृत्तसंस्था, माध्यमसंस्था, व पर्यायाने अमेरिकी संस्कृती ह्यांचे हे शब्दचित्र भारतातील सद्यस्थितीस चपखलपणे लागू होते असे वाटल्यामुळे हा अनुवाद-प्रपंच.

वॉटरगेट प्रकरणाने सुरू झालेल्या व रिचर्ड निक्सनच्या राजिनाम्याने संपलेल्या नाट्यमय घटना होऊन आता उणीपुरी वीस वर्षे होऊन गेली आहेत. ह्या वीस वर्षांच्या काळात अमेरिकी प्रसार माध्यमे त्या प्रकारातील त्यांच्या योगदानाविषयी विचित्र आत्मस्तुती करताना, व बचावात्मक पवित्रा घेताना दिसली. ही आत्मस्तुती अनाठायी असली तरी त्यांचा बचावात्मक पवित्रा मात्र दुर्दैवाने योग्यच आहे. अमेरिकी प्रसारमाध्यमांत दाखवली जाणारी अमेरिका अधिकाधिक प्रमाणात आभासी व भ्रामक आहे--विद्रूप, खोटी, आणि आपल्या आयुष्यापासून तुटलेली आहे. अमेरिकी जीवन दाखवताना माध्यमे सातत्याने व नवनवीन पद्धतीने चुकत असतात. त्यांचे वार्तांकन धेंडांनी, धेंडांच्या पूजनाने, आणि सनसनाटी व कुटाळक्यावजा निकृष्ट बातम्यांनी विकृत झाले आहे; समाजाच्या खर्या अवस्थेस विन्मुख झाले आहे. वृत्तपत्रे, इतर माध्यमे, राजकारणी, व आपण सारे, राजकीय व सामाजिक चर्चेला गटाराचे स्वरूप आणत आहोत.
पुन्हा वॉटरगेटकडे वळू. त्यात विशेषत: वृत्तपत्रांसाठी एक बोध आहे. वीस वर्षांपूर्वी, १७ जून १९७२ रोजी, मी व बॉब वूडवर्ड वॉशिंग्टन पोस्टसाठी वॉटरगेट प्रकरणाचा शोध घेऊ लागलो. कोलंबिया स्कूल ऑफ जरनॅलिझमनुसार वॉशिंग्टन डि.सी.मध्ये त्यावेळी साधारण २००० पूर्णवेळ पत्रकार कार्यरत होते. पहिल्या सहा महिन्यात अमेरिकी वृत्तसंस्थांनी त्या २०००तील केवळ १४ जणांना ह्या बातमीवर पूर्णवेळ कामाला लावले, आणि त्या १४पैकी "शोध-पत्रकारिता" करणार्या पत्रकारांची संख्या होती केवळ सहा. म्हणजे पत्रके गोळा करण्याच्या व कोर्टाच्या कामकाजाचे वृत्तान्त लिहिण्याच्यापलीकडे जाऊन काही करण्यासाठी, नक्की काय घडले होते ते शोधण्यासाठी फक्त त्या सहा जणांना नेमले होते.
“शोध" पत्रकारितेभोवती कितीही मिथके असली तरी आम्ही वॉटरगेटमध्ये नक्की काय केले व काय केले नाही हे लक्षात ठेवायला हवे. खरे म्हणजे आम्ही जे केले ते काही फार वेगळे नव्हते. वॉटरगेटची बातमी उकरून काढताना आम्ही मूलभूत पोलीसी पत्रकारिताच करत होतो. उमेदवारीच्या काळात जुन्या वॉशिंग्टन स्टारमध्ये आम्हाला शिकवलेल्या मेहनत, व्यवहारज्ञान, व सत्याचा आदर ह्या तत्त्वांवर आमची भिस्त होती. वुडवर्डला व मला ज्या बातमीचा छडा लावायला सांगितला होता ती मुळात एका घरफोडीची बातमी होती. तिचा तपास आम्ही आम्हाला ठाऊक असलेल्या पत्रकारी तंत्रांनीच केला. लोकांच्या दारी गेलो, बरेच प्रश्न विचारले, खूप ऐकले - सर्व चांगले पत्रकार वर्षानुवर्षे करत आले आहेत तेच आम्हीही केले. आम्ही स्थानिक पत्रकार होतो, आमच्याकडे कोणी बातम्या पुरवणारे उच्चपदस्थ स्रोत नव्हते, की अमर्याद खर्चाची मुभा नव्हती. मोठ्या लोकांना आम्ही उंची फ्रेंच हॉटेलात नेऊ शकत नव्हतो. कामगार होतो आम्ही.
त्यामुळे आम्ही मेहनत केली, कारकुनांच्या, सचिवांच्या, प्रशासकीय सचिवांच्या मुलाखती घेतल्या. त्यांना त्यांच्या कार्यालयांबाहेर रात्री आणि शनिवारी-रविवारी भेटलो. अभियोक्ते व FBI चे तपासनीसही ह्याच सर्वांना भेटले, पण ते भेटले ते दिवसाढवळ्या, त्यांच्या कार्यालयात, आणि शासनाच्या वकिलांसमक्ष; त्यांच्या कामापासून व दबावापासून दूर, खासगीत नव्हे. साहजिकच FBI व न्याय खात्याचे निष्कर्ष आमच्याहून बरोबर उलटे होते. त्यांनी महत्त्वाच्या माहितीकडे डोळेझाक केली कारण (तत्कालीन कार्यकारी निदेशक एल. पॅट्रिक ग्रेंच्या म्हणण्यानुसार) राष्ट्राध्यक्षांभोवती असलेल्या माणसांवर त्यांनी विश्वास ठेवला.
आमच्या साध्या पद्धतीतून असाधारण व वादातीत माहिती मिळेपर्यंत आमच्या सहकार्यांनीही आमच्या बातम्या गांभीर्याने घेतल्या नाहीत. ह्या बातम्या होत्या बेकायदा पद्धतीने व्हाइट हाउसने घडवून आणलेल्या राजकीय हेरगिरीच्या; पद्धतशीर घातपाताच्या, काळ्या पैशांच्या, फोन टॅपिंगच्या. ह्या बातम्या होत्या हे सर्व अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसाठी करणार्यांच्या, आणि शेवटी हे सारे दडवण्यासाठी राष्ट्राध्यक्षांनी केलेल्या बेकायदा प्रयत्नांच्या.
ह्या बातम्यांवरची निक्सन राजवटीची प्रतिक्रिया लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. त्यांनी वॉटरगेट प्रकरणाबाबत प्रतिक्रिया देताना राष्ट्राध्यक्ष व त्यांच्या सहकार्यांच्या वर्तनाऐवजी वृत्तसंस्थांच्या वर्तनाचा मुद्दा उपस्थित केला. निक्सनचे व्हाइट हाउस रोज 'न-नकार' देत असे. आमच्या बातम्यांवर टिप्पणी मागितल्यास वृत्त सचिव रॉन झिगलर, हाउस विरोधी पक्ष-नेते जेरी फोर्ड, किंवा सिनेट रिपब्लिकन नेते बॉब डोल त्या बातम्यांतील मुद्द्यांविषयी न बोलता आम्ही त्यांच्यावर वैयक्तिक हल्ला केल्याचे, ऐकीव माहितीवर विसंबून राहिल्याचे, व व्याजोक्तीचे आरोप करत असत. वॉटरगेट घरफोडीसाठी, व ते प्रकरण दाबून टाकण्यासाठी वापरण्यात आलेला गुप्त पैसा राष्ट्राध्यक्षांच्या निकटच्या सहकार्यांच्या ताब्यात होता अशी बातमी जेव्हा आम्ही दिली, तेव्हा व्हाइट हाउस उत्तरले, “वॉशिंग्टन पोस्टचे स्रोत म्हणजे चुकीच्या माहितीची उगमस्थाने आहेत.” (जॉन मिचेल तर मला म्हणाला होता: “हे जर तुम्ही छापलेत तर केटी ग्रॅहॅमचे स्तन चरकातून काढले जातील...”).
वृत्तसंस्थांना लक्ष्य करण्याचे हे निक्सनी तंत्र वॉटरगेट प्रकरणानंतर नाहीसे होण्याऐवजी रीगन शासनात अधिक विकसित व छद्मी झाले, आणि ते आजतागायत फोफावतच आहे. पुराव्यादाखल इराण-कॉन्ट्रा ह्या दुर्दैवी घटनेविषयी रीगनचे बोलके विधान पहा: “वृत्तसंस्थांना बेरूटमधील त्या वर्तमानपत्राकडून बातमी मिळेपर्यंत व त्यांनी तिला वारेमाप प्रसिद्धी देईपर्यंत ही हार कोणाच्या गावी नव्हती. म्हणजे मुळात हे सर्व प्रेसच्या बेजबाबदारपणामुळे घडले आहे.”
आता जॉर्ज बुशच्या रूपात गुप्ततेने झपाटलेला आणखी एक राष्ट्राध्यक्ष आपल्याला लाभला आहे. ह्याच्या माणसांनी व्हाइट हाउसच्या समोर लाफायेट स्क्वेअरमध्ये अमली पदार्थांसाठीची खोटी धाड टाकली होती. त्याची बातमीदारांनी दखल का घ्यावी हेच ह्यांना समजत नाही. बुश विचारतात, “तुम्ही कोणाच्या बाजूने आहात?”. खरा निक्सनी प्रश्न. (बुशसकट) सरकारी अधिकार्यांना असलेली प्रेसविषयीची ही तुच्छता हा निक्सन शासनाचा सर्वात महत्त्वाचा व टिकून राहणारा वारसा असावा.
मागे वळून पाहता असे वाटते की आम्ही कितीही नाकारले तरी वृत्तसंस्थांच्या विश्वासार्हतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा निक्सन शासनाचा डाव बर्याच अंशी यशस्वी झाला. ह्याला कारण आहेत आमच्यातील उघड उणिवा. आमचे वार्तांकन तेव्हढे बरे नव्हते हे कटू सत्य आहे. निक्सनच्या काळात नव्हतेच, रीगनच्या कालावधीत जास्तच खराब झाले, व आजही तसेच खराब आहे. आम्ही उन्मत्त आहोत. समाजातील शक्तिशाली संस्थांच्या सखोल परिनिरीक्षणाची (scrutiny) आम्ही मागणी करतो पण स्व:तच्या वृत्तसंस्थांच्या व माध्यमांच्या छाननीची मागणी करत नाही. राजकारण्यांच्या व नोकरशहांच्या चुका दाखवतो पण स्वत:च्या चुका विनयाने स्वीकारत नाही.
वुडवर्ड नुकताच म्हणाला त्याप्रमाणे आज वृत्तव्यवसायात सगळ्यात मोठा अपराध कोणता असेल तो एखादी मोठी बातमी मिळवण्यासाठी उशीर करणे, किंवा ती अजिबात न मिळवणे हा. काटेकोरपणे सांगायचे झाले तर महत्त्वाची बातमी न मिळवताना दिसणे, किंवा उशिरा मिळवताना दिसणे . त्यामुळे परिपूर्णता, दर्जा, अचूकता, व तारतम्य ह्यांची जागा वेगाने व संख्येने घेतली आहे. स्पर्धेचा दबाव, दुसरा कोणीतरी बातमी आधी देईल ही भीती, एक बेभान वातावरण निर्माण करतात, ज्याने माहितीचे वादळ निर्माण होते पण गंभीर प्रश्न उठवले जात नाहीत; आणि उठवले गेलेच (क्लिंटन कुटुंबाविषयी गेले तसे) तरी कोणीही त्यावर आठवडेच्या आठवडे, वा महिनोन् महिने काम करून उत्तरे शोधलेली नसतात.
बातमीदार होणे म्हणजे लघुलेखक होणे नव्हे. बातमी म्हणजे सत्याचे सर्वोत्तम उपलब्ध रूप. पत्रकारितेचा महत्त्वपूर्ण कल अशा सत्यशोधनाविषयीच्या बांधीलकीचा किंवा गंभीर, वैचारिक पत्रकारितेचा राहिलेला नाही. आणि हे आपल्या वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानांवरून, "पेज थ्री"वरून आणि दूरचित्रवाणीवरील बातम्यांतून पदोपदी जाणवते.
एबीसी न्यूजवरील (सर्वाधिक अमेरिकी नागरिकांचा बातमीस्रोत) “प्राइम टाइम लाइव" मध्ये डायॅन सॉयरने एका मुलाखतीत मार्ला मेपल्सला विचारले, “तो तुझ्या जीवनातला सर्वोत्कृष्ट संभोग होता का?”. हा प्रश्न म्हणजे पत्रकारितेचा नीचांक होता. (सॉयर आता वर चढण्याचा प्रयत्न करत आहे). पंधरा वर्षांहून अधिक काळ आपण खर्या पत्रकारितेपासून दूर जात एक निकृष्ट माहिती-करमणूक अशी संकरित संस्कृती निर्माण करत आहोत. ह्या संस्कृतीत ओप्रा आणि बातमीदारांमधील, वर्तमानपत्रे व कुटाळक्यांमधील भेद लोप पावत आहे. ह्या नव्या काचकुलिक (titillating) पत्रकारितेतून आपण आपल्या वाचकांना, प्रेक्षकांना काय शिकवतो तर किरकोळ गोष्टीच कशा महत्त्वपूर्ण आहेत, वेडपटपणा खर्या बातम्यांहून कसा महत्त्वाचा आहे, हे. आपण वाचकांची, प्रेक्षकांची सेवा करत नाही, तर कुंटणगिरी करतो. आपण त्यांना कमी लेखतो, त्यांना काय हवे आहे ते आपणच ठरवतो आणि त्यांना तेच देतो, जे खपेल व आपले मुल्यांकन जे वाढवू शकेल तेच देतो. दुर्दैवाने त्यांच्यातील अनेक लोक त्यांना कमी लेखणे योग्यच असल्याचे सिद्ध करतात, आणि आपण दिलेल्या कचर्याने उद्दीपित होतात. पत्रकारांचे काम लोकांना आव्हान देण्याचे आहे, त्यांना केवळ हसवण्याचे नाही.
एकुणात काय तर आपण एक बिनडोक संस्कृती निर्माण करत आहोत. प्रत्येक समाजाच्या पृष्ठभागाखाली असणारी एक निरुपद्रवी व गमतीदार बिनडोक उपसंस्कृती नव्हे तर प्रत्यक्ष संस्कृती. इतिहासात प्रथमच वैचित्र्य, निर्बुद्धपणा, व ढोबळपणा हे आपले सांस्कृतिक दंडक, आपले सांस्कृतिक आदर्श होत आहेत. गेल्या महिन्यात न्यू यॉर्कमध्ये झालेल्या निवडणुकीत "डॉनाह्यू", “आयमस इन धी मॉर्निंग", न्यू यॉर्क डेली न्यूज, व न्यू यॉर्क पोस्ट ह्यांच्या लांछनास्पद वार्तांकनाने न्यू यॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट, दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील वार्तांकन, आणि अनुभवी व गंभीर पत्रकारांना झाकोळून टाकले. प्रत्यक्ष न्यू यॉर्क टाइम्सचीही इतकी अधोगती झाली आहे की त्यांनी विली स्मिथ खटल्यातील बलात्कारितेचे नाव छापले; किटी केलीला बातमी बनवून पहिल्या पानावर झळकवले; सर्वेक्षणांना धोरणांचे रूप दिले.
माझा उद्देश लोकप्रिय संस्कृतीवर हल्ला चढवण्याचा नाही. चांगली पत्रकारिताही लोकप्रिय संस्कृतीचाच भाग आहे, पण ती उपभोक्त्यांना माहिती पुरवते, त्यांच्या कक्षा रुंदावते. त्यांच्या सतत घसरणार्या ल.सा.वि.च्या पातळीला उतरत नाही. लोकप्रिय संस्कृती म्हणजे उपभोक्त्यांची संपूर्ण निष्क्रियता असे समीकरण असेल तर दर्जेदार, लोकप्रिय पत्रकारिता संपलीच असे म्हणावे लागेल. दुर्दैवाने आजकाल खर्या पत्रकारितेची जागा लोकप्रिय संस्कृतीच्या नीचतम पातळीने - माहितीच्या अभावाने, चुकीच्या माहितीने, खोट्या व विपर्यस्त माहितीने, आणि सत्याविषयीच्या व सामान्यांच्या आयुष्यांविषयीच्या तुच्छतेने - घेतली आहे.
आज सामान्य अमेरिकन लोकांना कचरा भरवला जात आहे : डॉनाह्यू-जेराल्डो-ऑप्रा तमाशे (बाजारात विरुद्ध-लिंगी कपडे घालणारे; कोपर्यावरच्या हॉटेलातले मवाली; खुन्यांच्या आणि लैंगिक गुन्हेगारांच्या मनोव्यापाराबद्दल बोलणारे प्रसिद्धीलोलुप मानसशास्त्रज्ञ); मॉरी पॉविच बातमीपत्र; “हार्ड कॉपी"; हॉवर्ड स्टर्न; गाजावाज्याचाही गाजावाजा करणारे स्थानिक बातमीपत्रांचे खास भाग. गेल्या महिन्यात न्यू यॉर्कसारख्या तथाकथित सुविकसित आणि प्रसारमाध्यमांसाठी देशातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या शहरात ११च्या बातम्यात एक पाच भागांची मालिका दाखवली गेली. तिचे नाव होते "व्हेअर डू दे गेट दोज पीपल..." (ही माणसे त्यांना सापडतात तरी कुठे...?) जेराल्डो, ऑप्रा, आणि डॉनाह्यू ह्यांना त्यांच्या कार्यक्रमात येणारी विचित्र माणसे कुठे सापडतात ह्यावर ही मालिका होती. (मालिकेच्या ट्रेलरमध्ये डॉनाह्यू डायपर घातलेल्या व तोंडात बोंड असलेल्या माणसाची मुलाखत घेताना दाखवला होता).
ही भंकस पत्रकारिता आहे हे उघड आहे. मुद्दा केवळ एवढाच नाही. हेही लक्षात घेणे गरजेचे आहे की हा कार्यक्रम NBCच्या वाहिनीवर होता. जेराल्डोचे वितरक कोण? तर शिकागोची ट्रिब्यून कंपनी. ज्या वाहिन्यांवर विरुद्ध-लिंगी कपडे घालणारे, हिजडे, मवाली, अनेक खून करणार्यांचे वकील वगैरे लोक मिरवतात त्या वाहिन्या कोणाच्या आहेत? त्या आहेत मोठ्या केबल कंपन्या, धी वॉशिंग्टन पोस्ट कंपनी, आपल्या स्वत:च्या वाहिन्या असलेली डझनावारी वर्तमानपत्रे, टाइम्स-मिरर, न्यू यॉर्क टाइम्स कंपनी वगैरेंच्या. गेल्या महिन्यात तर ह्या बिनडोक संस्कृतीची, पीत पत्रकारितेची सर्वात महत्तम निर्मिती असलेली इवाना ट्रम्प ही व्हॅनिटी फेअरच्या मुखपृष्ठावर झळकली. म्हणजे कॉन्डे नॅस्टच्या अग्रगण्य मासिकावर! ह्याच कॉन्डे नॅस्ट / न्यूहाउस / रॅन्डम हाउसचे कर्मचारी आपल्या पेशाविषयी अतिशय गांभीर्याने बोलतात, अमेरिकी संस्कृतीविषयी तासन्तास बोलतात, सत्याविषयी आपण किती गंभीर आहोत ते सांगत असतात.
न्यू यॉर्क टाइम्सच्या विक्रमी खपाच्या पुस्तकांच्या यादीवरही एक नजर टाका. "डबल क्रॉस: धी एक्स्प्लोसिव इन्साइड स्टोरी ऑफ धी मॉबस्टर हू कन्ट्रोल्ड अमेरिका", लेखक : सॅम व चक गियान्काना , वॉर्नर प्रकाशन, $२२.९५. (ते $२२.९५ विसरू नका.) हे पुस्तक म्हणजे अथपासून इतिपर्यंत निव्वळ कल्पनाविलास आहे. त्यात कपोलकल्पित गोष्टी, थापा, न घडलेली कटकारस्थाने, खोटी व चुकीची माहिती काठोकाठ भरलेली आहे. हे सर्व कशासाठी, तर एका गुंडाच्या प्रसिद्धीलोलुप नातलगांचा अहंकार सुखावण्यासाठी, व कुणाचे तरी खिसे भरण्यासाठी. परंतु हे पुस्तक प्रकाशित केले आहे टाइम वॉर्नर समूहाचा एक भाग असलेल्या वॉर्नर प्रकाशनाने. ह्या समूहाशी माझा दीर्घ काळ संबंध आहे. ('ऑल धी प्रेसिडंट्स मेन' हा चित्रपट वॉर्नर ब्रदर्सने काढला होता, त्याची मृदुपृष्ठावृत्ती वॉर्नर प्रकाशनाने काढली होती, व मी टाइम मासिकाचा वार्ताहर म्हणून नुकतीच दोन वर्षे पूर्ण केली आहेत.) असले फसवणूक करणारे पुस्तक निव्वळ आर्थिक लाभाकरता छापणे टाइमच्या प्रकाशकांना शोभत नाही.
ज्या संस्थांवर मी हल्ला चढवतो आहे त्या एव्हाना (अनुवादकाची नोंद: बचावासाठी) घटनेच्या पहिल्या दुरुस्तीचे नाव घेऊ लागल्या असतील. पण मुद्दा पहिल्या दुरुस्तीचा, किंवा अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा नाहीच. स्वतंत्र देशात कचरानिर्मितीचेही स्वातंत्र्य आहेच. पण कचर्यास कोठून तरी वाट मिळणारच आहे म्हणून आपणच त्याला वाट करून द्यावी असे नाही. सध्या ह्या देशातील मोठमोठे माहिती-समूह कचरा वितरणाचा धंदा करत आहेत. आपण सारे अश्लील साहित्य पाहताक्षणी ओळखू शकतो, त्यालाही अस्तित्वाचा हक्क आहे. पण ह्याचा अर्थ असा नाही की आपण सार्यांनी अश्लील साहित्य प्रकाशित करावे. गेल्या पंधरा वर्षात अमेरिकेत फार थोड्या बड्या माध्यमसंस्था अशा असतील ज्या अश्लीलतेशी समतुल्य राजकीय व सामाजिक व्यवसायात उतरल्या नाहीत.
खरे तर अनेक आता कमरेपर्यंत त्या चिखलात रुतल्या आहेत. डॉनाह्यूचे उदाहरण घ्या. अठरा वर्षांपूर्वी वूडवर्ड व मी आमच्या पुस्तकाच्या प्रसिद्धीसाठी ओहायोला गेलो होतो. तिथे टॉक शोच्या माध्यामातून उत्तम मुलाखती घेणारा एक माणूस आहे असे ऐकले होते आणि ते खरेही निघाले. डॉनाह्यूने आमचे पुस्तक वाचले होते. त्याच्याकडे तक्ते होते, पुरावे होते. राष्ट्रावर आणि माध्यमांवर वॉटरगेटचे काय परिणाम होतील ह्यावर त्याने गांभीर्याने चर्चा केली. मात्र, गेल्या महिन्यात डॉनाह्यूने त्याच्या कार्यक्रमात बिल क्लिंटनला बोलावले--आणि अर्धा तास त्याच्यावर अशी काही चिखलफेक केली की स्टुडियोतील प्रेक्षकही चिडले. WNBCच्या "व्हेअर डू दे गेट दोज पीपल...?” ह्या खास कार्यक्रमासाठी डॉनाह्यूचीही मुलाखत घेतली तेव्हा ऑप्रा व इतर असेच करतात म्हणून मलाही करावे लागते असे त्याने त्यात स्वत:चे लंगडे समर्थन केले होते.
सवंग पीत-पत्रकारिता पहिल्यापासून होती. हेड्डा हॉपर व वॉल्टर विन्चेलसारख्यांची कुटाळकीवजा सदरेही होती. पण आजच्यासारखी परिस्थिती ह्याआधी कधीच नव्हती. आज ह्या देशातील तथाकथित बुद्धिजीवी व उच्चभ्रू लोक अशा स्वरूपाच्या सदरांवर व कार्यक्रमांवर जीव टाकतात, त्यांच्यावर विश्वास ठेवतात. करोडो लोकांसाठी माहिती व बातम्यांचे हेच मुख्य स्रोत असतात. न्यूजडेची गॉसिप सदर-लेखिका लिझ स्मिथ हिने अनेकदा कबूल केले आहे की ती तिच्या "बातम्यां"ची सत्यासत्यता तपासण्यासाठी फारसे कष्ट घेत नाही, किंवा ज्यांच्याविषयी ती लिहिते त्यांना त्यावर प्रत्युत्तर देण्याची संधीही देत नाही. आणि ही त्यातल्या त्यात बर्या गॉसिप-लेखिकेची कथा, तर इतरांचे काय सांगावे!
रीगन फार बुद्धिमान नसला तरी तो खरा नेता होता हे त्याच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या आठ वर्षांत पत्रकारांच्या लक्षात आलेच नाही. फ्रॅंकलिन रूझवेल्टनंतर आलेल्या इतर कोणत्याही नेत्याने अमेरिकेला एव्हढे बदलले नाही, की देशावर व जगावर आपला इतका ठसा उमटवला नाही. पण रीगनच्या कार्यकालात शासनाच्या धोरणांचे जनतेवर व संस्थांवर, शिक्षणक्षेत्रात, कार्यालयांमध्ये, न्यायालयांमध्ये, कृष्णवर्णीयांवर, सामान्य कुटुंबांवर कोणते परिणाम होत आहेत हे पाहण्यासाठी आम्ही बातमीदार वॉशिंग्टनबाहेर गेलो असे क्वचितच घडले. रीगनच्या "दुष्ट साम्राज्या”विरोधी भाषणांची टर उडवण्यात आम्ही इतके दंग होतो की त्याचे धोरण व गोर्बाचेवचे उदारीकरण ह्यातील कार्यकारणभाव आम्हाला समजलाच नाही. खरे म्हणजे, आमच्या काळातील बहुतेक महत्त्वाच्या घटनांकडे आमचे दुर्लक्षच झाले. उदा. इराण-कोन्ट्रा, सेव्हिंग्स व लोन बॅंक घोटाळा.
वृत्तसंस्थांच्या ह्या अपयशातून "टॉक-शो"-देशाचा उद्गम झाला आहे. ह्यात सार्वजनिक चर्चेची जागा आरडा-ओरड्याने व नाटकी अभिनिवेषाने घेतली आहे. वृत्तसंस्थांच्या विषय-पत्रिकांवर ह्याचाच पगडा असतो. ज्या दिवशी नेल्सन मॅंडेला सोवेटोला परतले, आणि दुसर्या महायुद्धाच्या जेत्यांनी जर्मनीच्या एकीकरणाला परवानगी दिली त्या दिवशी अनेक "जबाबदार" वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानांवर डोनाल्ड व इवाना ट्रम्प ह्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या झळकत होत्या.
ह्या "टॉक-शो" संस्कृतीची जणु परिसीमा म्हणता येईल असा रॉस पेरो हा राष्ट्राध्यक्षपदाचा उमेदवार आता आपल्यासमोर आहे. हा उमेदवार दूरचित्रवाणीने निर्मिला व तगवला. “लॅरी किंग लाइव्ह" ह्या कार्यक्रमाद्वारे हा प्रथम लोकांसमोर आला. ह्याचे शिरा ताणून बोलणे, व आविर्भाव लोकशाहीशी फारसे सुसंगत नाहीत. ह्याचा सर्वात महत्त्वाचा प्रस्ताव काय तर म्हणे लोकशाहीची जागा संपूर्ण देशासाठी असलेल्या एका "टॉक-शो"च्या थेट प्रक्षेपणाने घ्यावी. अन् असा हा स्वत:च्या अनभिज्ञतेचा अभिमान असणारा उमेदवार सध्या बर्याच मोठ्या राज्यांतील सर्वेक्षणात दोन्ही प्रमुख पक्षांच्या उमेदवारांवर आघाडी घेऊन आहे.
आज अमेरिकेची दुर्दशा ही जगातील सर्वात महत्त्वाची बातमी आहे. आपली राजकीय व्यवस्था संकटात आहे; अमेरिकी लोकशाहीच्या जडणघडणीचा पाया असलेली समाज-भावना लोप पावत चालली आहे. “टॉक-शो"-देशाचा उद्भव हा ह्याचाच एक भाग आहे. आजही चांगली पत्रकारिता आहे, नाही असे नाही. पण ती नियमाला अपवाद आहे. चांगल्या पत्रकारितेस लागणारे धैर्य आज माध्यमांत अभावानेच दिसते. अमेरिकेतील वर्णभेद, अर्थकारण, आपल्या शहरांचे भवितव्य ह्यांविषयीच्या अनेक प्रचलित गृहीतकांना आव्हान देण्याची गरज आहे. त्यासाठी माध्यमांपासून सुरुवात करता येईल, कारण वर्णभेदाखालोखाल अमेरिकी माध्यमांची सद्यस्थिती ही आज अमेरिकेतील सर्वात मोठी दुर्लक्षित बातमी आहे. समाजातील इतर शक्तिशाली संस्थांबद्दल विचारतो तेच मूलभूत प्रश्न वृत्तसंस्थांविषयी विचारण्याची गरज आहे--त्या कोणाची सेवा करताहेत, त्यांचा दर्जा काय आहे, त्यांचे स्वहित, व ते जपण्यामुळे सामाजिक हितास व सत्यशोधनास ग्रहण लागत आहे काय, वगैरे. वस्तुस्थिती ही आहे की आज इतर सर्व संस्थांहून माध्यमे प्रबळ आहेत; आणि ती त्यांच्या शक्तीचा अपव्यय करत आहेत व दायित्वाकडे कानाडोळा करत आहेत. त्यांनी--किंवा खरे तर आपण--जबाबदार्या झटकून टाकल्या आहेत, आणि ह्याचा परिणाम म्हणजेच बिनडोक संस्कृतीचा विजय.

No comments:
Post a Comment