गझला लिहिण्याचा प्रयत्न सुरू केल्यापासून ह्या विषयावर बराच काळ विचार केल्यावर मला पडलेले काही प्रश्न नि माझे विचार खाली मांडतोय. त्यावर इतर गझलकारांची तथा वाचकांची मतं जाणून घ्यायला आवडेल.
- सुबोधता हा गुण आहे हे निश्चित. परंतु सुबोधतेचा अतिरेकी अट्टाहास हा क्वचित अन्य काव्यगुणांना मारक ठरत नाही का?
- दुर्बोधतेसाठी दुर्बोधता असू नये हे निर्विवाद आहे. पण साऱ्या भाव-भावना, सारे अनुभव सरल व सुगम असतात का? अनेकदा जे सांगायचं असतं ते धूसर, शब्दांच्या चिमटीत निटसं पकडता न येण्यासारखं असतं. मानवी मनाची स्पंदनं, त्याचे खेळ, त्याचे मनोव्यापार, माणसांच्या कृतींचा कार्यकारणभाव हे सर्व खरचं २+२=४ इतकं सरळ, सोपं व ढोबळ असतं? मग शेरांतील त्यांची शब्दचित्रंही तशीच किंचित अंधूक, अस्पष्ट, वेगवेगळ्या छटा असणारी उमटायला नकोत का? ती जर आपण काटेकोर, सुस्पष्ट, कृष्णधवल चितारली तर ती आकर्षक दिसली तरी गाभा हरवून बसलेली वाटतील.
- इतर कविता वाचताना आपण त्यात येणारी प्रतीकं स्वीकारतो. प्रथमदर्शनी अर्थबोध झाला नाही तर त्यावर विचार करतो, चिंतन करतो व अर्थ लावतो. हाच न्याय, हीच मोजपट्टी गझलेला का लावू नये ? गझल हीसुद्धा कविताच असते ना? किंबहुना कुठलीही गझल म्हणजे किमान पाच कविता (पाच शेर). मग गझलेच्या बाबतीतच ती पहिल्या वाचनात कळलीच पाहिजे हा आग्रह का? इतर कवितांप्रमाणे शेर तीन-चारदा वाचूनही सुजाण वाचकाला कळला नाही तर तो फसला असं खुशाल समजावं. पण तो वाचताना आपल्याला डोकं अजिबात वापरायला लागू नये ही भूमिका निदान मला तरी पटत नाही.
- Allusions/संदर्भ : गझलेत राजकीय/सामाजिक/ऐतिहासिक/पौराणिक allusions(माफ करा, पटकन मराठी प्रतिशब्द आठवत नाही आहे.) व संदर्भ वापरले आणि ते वाचकांनी उचलले, त्यांना समजले तर लेखकाला होणारा आनंद अवर्णनीय असतो. निदान मला तरी होतो. तुमचं मत काय आहे?
- गझल लिहिणाऱ्यांनी आपल्या वाचकांना प्रौढ आणि बुद्धिमान का समजू नये? दरवेळी वाचणारा बालबुद्धी आहे असा समज करून घेऊन आपल्या शेरात जे सांगायचे आहे ते ह्तोडा मारल्यासारखं त्याच्या डोक्यात मारायलाच हवं का? Is there no room for subtlety in a ghazal?
ही चर्चा मी खरं तर
मनोगत वर मांडणार होतो. पण तिथे चालणाऱ्या तिरक्या अभिप्रायांमध्ये आणि तिरकस शेरेबाजी व कट्टाछाप टवाळकीमध्ये मूळ चर्चा बाजूला राहते, विषयांतरात लुप्त होते वा वैयक्तिक उखाळ्या-पाखाळ्यांमध्ये रुपांतरित होते. म्हणून तिला इथे, जालनिशीवर मांडायचे ठरवले. आपली अनुकुल/प्रतिकुल मतं जरूर नोंदवा.
मला वाटतं की सुबोधता ही श्रीखंडाच्या पातेल्यासारखी आहे. तसेच प्रतिकात्मक भाषेचा वापर हा लोणच्याची फोड असावी तसा आहे. अतीगोड जसे वर्ज्य तसेच लोणच्याने पोट भरत नाही हेहे तितकेच सत्य आहे. त्यामुळे अतीसुबोधतेचा हव्यास नको, कुठेतरी प्रतिकांचा वापर झाला पाहीजे. अर्थात हे माझं मत झालं. एखाद्या कवीचे मत सर्वस्वी वेगळेही असू शकेल.
ReplyDeleteचर्चाविषय आवडला, (आणि परस्वाधीन खुल्या चर्चामंडळांबद्दलचे विचारही पटले.)
ReplyDeleteगज़ल हा एक काव्यप्रकार मानूनच मी पुढची सगळी मतं मांडतेय. त्यामुळे 'इतर कविता' आणि 'ग़ज़ल' असा फरक करत नाहीये.
('ग़ज़ल पहिल्या वाचनात कळली पाहिजे, इतर कवितांना तसं बंधन नाही', ही भूमिका तुम्हांला कुठे पहायला मिळाली? तिच्यामागचं कारण मला समजत नाही आहे. ग़ज़ल मुशायऱ्यांमध्ये सादर केली जाते, स्वरबद्ध असू शकते म्हणून का?)
तुमच्या लेखातल्या मुद्द्यांबद्दल:
(१,२) अगदी बरोबर. शैलेश खांडेकरांनी म्हटलंय तसा कुठल्याही गोष्टीचा, मग ती सुबोधता असो की दुर्बोधता, अतिरेक वाईटच. प्रश्न येतो 'अतिरेक' या शब्दाच्या व्याख्येचा! बोधनाची पातळी व्यक्तीगणिक बदलते. लिहिणारी व्यक्ती कुणाकुणाचा म्हणून विचार करेल? मला तर वाटतं की लिहिताना ज्या शब्दांत सुचत जातं, त्या शब्दांत, त्या ओघात लिहिलं गेलं की ती कविता होते. सुबोधतेचा, वाचणाऱ्यांचा विचार केला की ते गीत होतं. (अर्थात हे इतकं काळं-पांढरं नाही; पण ढोबळमानाने असं धरून चालू की गीतकाराला श्रोत्यांचा विचार केल्याशिवाय गत्यंतर नसतं, पण कवीला 'मला स्वत:ला व्यक्त करायचं आहे, इतरांना ते कळलं किंवा नाही तरी हरकत नाही' हा विचार करून चालतं.)
(३,४) तरीही, कवीला आपली कविता इतरांना ऐकवावीशी वाटते.का? कविता हे आपल्या विचारांचं - उत्कट विचारांचं प्रतिबिंब असतं. ज्या भावनेनं मी मित्राजवळ मन मोकळं करतो गप्पा मारताना, त्याच भावनेनं कवितेत ते कागदाजवळ मोकळं झालेलं असतं. सर्वप्रथम माझी ऊर्मी म्हणून , स्वान्तसुखायच लिहिलेलं असल्यामुळे त्यात 'तळटीपा' आणि 'स्पष्टीकरणं' टाकायची गरज वाटत नाही. सुसूत्रपणे लिहिलेल्या एखाद्या लेखात आणि कवितेत फरक इथेच असतो, मला वाटतं.(कवितेत छंदोबद्धता येते ती 'झिंग' म्हणून! शब्दांशी खेळायला मजा येते म्हणून, आणि ग़ज़लेसारख्या बेहद्द सुरेख प्रकारात, तुम्ही म्हणता तशा त्या पाच किंवा जास्ती कविता एकत्र जास्तीच खुलून दिसतात म्हणून! ) मला वाटतं जेव्हा मी ही कविता कुणाला ऐकवते, तेव्हा त्यातला एक सुप्त/ दृश्य भाव असतो: 'एका क्षणी मला असं असं वाटलं होतं. तुम्हाला कळतंय का मला काय म्हणायचंय ते?'
आणि जेव्हा एखादा रसिक 'हो!' अशी दाद देतो, तेव्हा समविचारी/ समानुभवी व्यक्ती सापडल्याचा अतोनात आनंद मला होतो. एखादा शेर एखाद्याला पट्कन कळेल, कारण तोही त्याचसारख्या अनुभवातून किंवा विचारप्रक्रियेतून गेलेला असेल. आपल्या सामाजिक-पौराणिक-राजकीय प्रतीकांची त्याला माहिती असेल, कदाचित त्याने त्याच संदर्भात त्यावर कधी विचारही केला असेल! थोडक्यात कविता हे समोरच्याचे विचार जोखायचं एक 'माप' म्हणून वापरलं जाऊ शकतं.गप्पा मारतानाही आपण 'समविचारी' व्यक्तींबरोबर जास्त खुलून बोलतो. आपले विचार समोरच्याला कळले की कसं 'छान' वाटतं.
(माझी ही वरची सगळी बडबड तुम्ही allusions आणि संदर्भांबद्दल जो मुद्दा मांडलाय, त्याचाच विस्तार आहे असं दिसतंय!)
--मग या सगळ्यावरून, पुन्हा कविता सुबोध की दुर्बोध, याचं उत्तर काय? ...मला वाटतं याचं उत्तर 'आपण कविता का लिहितो?' या प्रश्नाच्या उत्तरात सामावलं आहे. "आपली कविता सर्वांना कळावी, चारचौघांच्या तोंडी व्हावी" ही इच्छा असेल तर तिला हेतुत: सुबोध बनवणं हा एक बरा मार्ग असू शकतो. आणि 'आपली कविता कोणाला कळली, हे कळावं ' अशी इच्छा असेल तर तिला ती उतरली तशीच राहू द्यावं!
(५). Of course there is a lot of room for subtlety in ghazal! आणि ही तरलताच तर त्या शेरांची खुमारी वाढवते. वरवरच्या दुर्बोधतेचा मला जाणवलेला 'फायदा' असा: वाचणारा एका शेराचे अनेक अर्थ काढू शकतो, पुष्कळदा ते त्या कवीलाही अभिप्रेत नसतात! पण मग त्यामुळे वाचकाला ती कविता 'आपल्या परीने' कळते. This subjectivity is the very charm of a non-straightforward poem, I guess.
या सगळ्यात एक मुद्दा असाही येईल, की ग़ज़ल लिहिल्यावर ती समोरच्याला कळलीय की नाही हे कळायचं कसं? मला वाटतं आजच्या ब्लॉगक्रांतीनं सोपं केलंय हे काम. मुशायऱ्यात शेर ऐकवल्यावर श्रोत्यांच्या प्रतिसादावरून कळत असेल शायराला, त्यांना तो 'झेपलाय ' की नाही ते. आजकाल हेच काम ब्लॉगवरच्या प्रतिसादांवरून होऊ शकेल :)
यावरूनच एक शंका येतेय. दुर्बोध वाटणाऱ्या कविता काव्यसमीक्षकांची गरज अधोरेखित करतात का? ग़ालिबच्या काही शेरांवरचं जाणकारांचं भाष्य वाचल्याशिवाय त्यांतली उच्चता कळतच नाही! :) मग ग़ज़लकारांनी ग़ज़ला लिहून झाल्यावर काही काळानं त्यांच्यावर भाष्यदेखील करावं/करवावं का?
शैलेश, पल्लवी, गायत्री,
ReplyDeleteआवर्जून चर्चेत सह्भागी होऊन आपापली मतं नोंदवल्याबद्दल मन:पूर्वक आभार.
शैलेश,समतोल असावा ह्याविषयी दुमत नाही.
पल्लवी, तुमचं निरीक्षण अचूक आहे. आणि 'उमराव जान'ची सय करून दिल्याबद्दल आभार. बऱ्याच दिवसांनी ती CD पुन्हा लावली आणि त्या शब्दां-सूरांत हरवून गेलो.
गायत्री, वेळात वेळ काढून इतका दीर्घ व मुद्देसूद अभिप्राय लिहिलात ह्याबद्दल धन्यवाद.
'ग़ज़ल पहिल्या वाचनात कळली पाहिजे, इतर कवितांना तसं बंधन नाही', ही भूमिका तुम्हांला कुठे पहायला मिळाली?
येणाऱ्या अभिप्रायांत हा सूर अधून-मधून ऐकू यायचा.म्हणून मला हा प्रश्न पडू लागला.
कविता हे समोरच्याचे विचार जोखायचं एक 'माप' म्हणून वापरलं जाऊ शकतं.गप्पा मारतानाही आपण 'समविचारी' व्यक्तींबरोबर जास्त खुलून बोलतो. आपले विचार समोरच्याला कळले की कसं 'छान' वाटतं.
अगदी मनातलं बोललात!
एका शेराचे अनेक अर्थ काढू शकतो, पुष्कळदा ते त्या कवीलाही अभिप्रेत नसतात!
शेरांचेच का, मला तर वाटतं की अनेकार्थित्व हे निव्वळ वर्णनात्मक नसलेल्या कोणत्याही कवितेचं सौंदर्यस्थान असतं.तुम्ही म्हणताय तसं, अनेकदा वाचक त्यामुळे कवीलाही न दिसलेले पदर उलगडून दाखवू शकतो.
ग़ज़लकारांनी ग़ज़ला लिहून झाल्यावर काही काळानं त्यांच्यावर भाष्यदेखील करावं/करवावं का?
स्वत: स्वत:च्या रचनांवर भाष्य करणे हे काहीसं स्वत:चा ढोल बडवण्यासारखं ठरेल, नाही का ? तसंच, आपल्याच लेखनाकडे इतक्या तटस्थपणे किती लेखक/कवी पाहू शकतात? हे समीक्षकांनी/वाचकांनी करायला हवं. (आणि हे शुभकार्य केलं गेलचं तर बहुधा कवी निजधामास गेल्यानंतर केलं जातं हे अलाहिदा.)
मला वाटतं की आपल्या गुंजारव या ब्लॉगवरील शोध ही गझल मी नुकतीच ऐकली. आपण मनोगतींच्या ठाणे कट्ट्याला आला होता कां?
ReplyDeleteसुबोध,दुर्बोध या वादाबद्दल मला वाटते की हे सापेक्ष आहे. अभिव्यक्तीला कोठलेच बंधन नसावे. एखाद्या रचनेला गझल , काव्य, पद्य वगैरे कांही म्हणावे की नाही या वादात पडण्यापेक्षा वाचकांना ती आवडणे जास्त महत्वाचे आहे.
खालचा वर्ड वरिफ़िकेशनसाठी उमटलेला शब्द बघुन मी हादरलोच होतो..पण विषय जिव्हाळ्याचा आहे.
ReplyDeleteअसो.
गझलेत तरलता नसते अस कुठं आहे..किंबहुना..ग्रेस यांच्या सर्व कविता तरी कुठे सोप्य, तरल असतात. त्यांमुळे लिहिणाऱ्याच्या दृष्टीकोनातून एखादी कविता/गझल जर जशी प्रसवत आहे तशी कागदावर उमटली तर तो न्याय आहे. काहीतरी हेतू मनात ठेवून तुम्ही सहज घडणारी कलाकृती छेडायला गेलात की बट्याबोळ झालाच म्हणून समजा.
गायत्री म्हणते त्याप्रमाणे,"'एका क्षणी मला असं असं वाटलं होतं. तुम्हाला कळतंय का मला काय म्हणायचंय ते?' हे महत्वाचं आहे.
सुरुवातीला मी स्वत: गझलेचे वृत्त वगळता सर्व नियम पाळून गझल लिहित गेलो अगदी सहज. पण नंतर मी प्रत्येक विचार वृत्तात बांधायचा प्रयत्न करायला लागलो आणि अक्षरश: गेले ४ महीने मी काहीही लिहू शकलो नाही. पण हा अट्टाहास दूर करून मी नुकतीच एक गझल लिहिली. आशय महत्वाचा आहे. दुर्बोधता/सुबोधता ही लिहिणाऱ्या आणि वाचणाऱ्या व्यक्तिपरत्वे बदलते.
बाकी तुझा ५ वा मुद्दा काही समजला नाही. बालबुद्धी समजणे-हतोडा मारणे उदाहरणासहीत सांगता येइल का तुला? माझी एखादी गझल वापरलीस तर मला लगेच समजेल. ;-)
chukalaach bagh word: stqyftyn
@ आनंद घारे : हो, मी ठाणे कट्ट्याला आलो होतो व तिथे ती गझल वाचून दाखवली होती.
ReplyDelete