Monday, April 30, 2007

ये कहाँ आ गये हम...

खालील लेख मी 'मनोगत'वर १७-०३-०७ रोजी सुपूर्त केला होता. प्रशासकांना व्यक्तिगत निरोप नव्हे तर 'धोरण, विचार' या सदराखाली एक लेख म्हणून. अपेक्षेप्रमाणे त्यांनी तो प्रकाशित केला नाही, परंतु त्याच दिवशी त्यांनी मला व्य. नि. पाठवून त्यांची बाजू मांडली. त्यांनी उत्तर व्यक्तिगत निरोपाच्या स्वरूपात पाठवलेले असल्यामुळे त्यांच्या संमतीशिवाय ते मी जाहीर करणे उचित नाही. त्यानंतर काही दिवसात प्रतिसाद अनुमतीशिवाय ताबडतोब प्रकाशित होऊ लागले. मात्र दीड महिना उलटल्यानंतरही अन्य कुठल्याही प्रकारचे लेखन 'अनुमतीच्या प्रतीक्षेत' जाते. म्हणून आता हा लेख मी इथे प्रकाशित करत आहे.
'मनोगत'च्या प्रशासकांना अनावृत पत्र

शनि, १७/०३/२००७ - १२:०६. » धोरण | विचार


गेल्या अडीच वर्षांहून अधिक काळ मी मनोगतचा सदस्य आहे. इतर अनेक मनोगतींप्रमाणे इथे आलो आणि ह्या संकेतस्थळाच्या प्रेमात पडलो, इथलाच झालो. मनोगत हे ब्रौझरचे गृहपृष्ठ झाले. तासा-तासाला इथे आल्याशिवाय चैन पडेना. मी व माझ्यासारखे अनेक सदस्य वैयक्तिक आयुष्यात भेटणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाला मनोगतला येण्याचा, वाचण्याचा आग्रह करू लागलो. फार थोड्या वेळात मनोगत हे महाजालावरील सर्वोत्कृष्ट मराठी फोरम बनले.


पण गेल्या काही महिन्यात हळूहळू परिस्थिती बदलू लागली. मनोगत बदलू लागलं. प्रशासकीय धोरणं धूसर असणं हा आधीही मनोगतचा कच्चा दुवा होता. आता तर ती जवळ जवळ अनाकलनीय झाली आहेत. प्रशासकीय हस्तक्षेप कमालीचा वाढला आहे. पोस्ट फॅक्टो मॉडरेशनची जागा प्रकाशनपूर्व सेन्सरशिपने घेतली आहे. खुलासे, स्पष्टीकरण देण्याच्या बाबतीत तसेही तुम्ही उदासीनच. आणि प्रत्येक लहान-सहान गोष्टीचा प्रशासकांनी खुलासा करावा ही अपेक्षाही नाही. पण महत्त्वाच्या विषयांवर, धोरणात्मक निर्णयांवरही तुम्ही मिठाची गुळणी धरून बसता. कुठल्याही प्रशासकाला प्रसंगी अप्रिय निर्णय घ्यावे लागतात. परंतु त्यामागचे विचार समोरच्यांना कळवल्यास ते स्वीकारणे तितके जड जात नाही.


स्वतः:चा अमूल्य वेळ, श्रम व पैसा खर्चून तुम्ही मनोगत निर्माण केलंत व आम्हाला उपलब्ध करून दिलंत ह्याबाबत आम्ही सारे मनोगती तुमचे ऋणी आहोत व राहू. पण प्रशासक, इतर संकेतस्थळं व फोरम ह्यात मूलभूत फरक असतो. सामान्य वेब-साईटमध्ये ती निर्माण करणाऱ्या माणसाने वा गटाने काही माहिती येणाऱ्यांसमोर मांडून ठेवलेली असते. ती लोकांना आवडली तर ते अधिकाधिक संख्येने तिथे येऊ लागतात व वेब-साईट यशस्वी ठरते. फोरमचं तसं नसतं हे मी तुमच्यासारख्या सुज्ञास काय सांगावं? फोरमचा निर्माता बनवतो तो सांगाडा. त्यात प्राण फुंकतात लिहिणारे-वाचणारे सदस्य. त्यांच्या जिवंत, उत्स्फूर्त सहभागाविना फोरमला काही अर्थ उरत नाही. आणि नेमक्या ह्याच उत्स्फूर्ततेवर, सहभागावर तुम्ही तुमच्या प्रकाशनपूर्व सेन्सरशिपमुळे कुऱ्हाड चालवत आहात. अहो, अगदी "लेख आवडला" सारख्या प्रतिसादासाठी कसली प्रशासकांची अनुमती? लेख, कविता, प्रतिसाद काहीही लिहिलं की ते ताबडतोब प्रकाशित व्हावं, त्यावर इतरांचे लगोलग कडूगोड प्रतिसाद यावेत, चर्चा/वाद यांच्या फेरी झडाव्यात हे मनोगतच्या जिवंतपणाचं व्यवच्छेदक लक्षण होतं.फोरमवरील लेखनात अश्लीलता असू नये, व्यक्तिगत चिखलफेक असू नये, ह्याबाबत दुमत नाही. पण त्यासाठी आधीही मॉडरेशन होतंच व त्यानुसार फोरम व्यवस्थित चालू होतं. जे सदस्य सतत नियमभंग करत असतील त्यांच्यावर वैयक्तिक निर्बंध लादावे. You've thrown out the baby with the bath-water! मनोगतचे बरेचसे सदस्य तरुण आहेत, १९७५ साली त्यांच्या एकतर जन्मही झाला नसेल किंवा ते फार लहान असतील. मात्र माझ्या वयोगटातील व माझ्याहूनही ज्येष्ठ सदस्यांना तुमच्या ह्या नियमांमुळे आणीबाणीतील सेन्सरशिपची आठवण होते हे खेदाने नमूद करावे लागत आहे. परंतु तेव्हाच्या परिस्थितीत व ह्या परिस्थितीत एक फार महत्त्वाचा फरका आहे,प्रशासक. आणीबाणीच्या जाचाला कंटाळून देश सोडून जाण्याचा मार्ग फार थोड्यांना उपलब्ध होता. मनोगतचे तसे नाही. महाजाल खूप मोठा आहे, पर्याय अनेक आहेत. पुढचं संकेतस्थळ केवळ एक टिचकीच्या अंतरावर असतं. प्रशासक, तुमच्या या धोरणांमुळे अनेक मनोगती आपलं मनोगत सोडून गेल्येत. काही तुमच्याशी उघडपणे भांडून, सदस्यत्व रद्द करून गेले तर अनेक मनाने दूर गेलेत, केवळ नामधारी सदस्य राहिलेत. पूर्वी नियमीतपणे लिहिणारे लिहिनासे झालेत, हिरिरीनं चर्चेत भाग घेणारे थंडावलेत. लेखनाची संख्या व दर्जा, दोन्हीचा आलेख खाली येत आहे हे कटू असलं तरी सत्य आहे. तुम्ही जर फक्त अधिकृत सदस्यसंख्येच्या आकड्याकडे बोट दाखवून स्वस्थ बसून राहणार असाल तर मात्र बोलणंच खुंटलं. प्रशासक, कोंबडं झाकलं म्हणून सूर्य उगवायचा राहत नाही.


तुम्हाला पटो अगर न पटो, हे सर्व मी 'मनोगत'वरील प्रेमापोटी लिहीत आहे. 'मनोगत'ला ऊर्जितावस्था प्राप्त व्हावी ह्या तळमळीपायी लिहीत आहे. प्रशासक, मनोगत एक जिवंत, खळाळता, फेसाळता चैतन्याचा झरा होतं. त्याचं असं डबकं होताना पाहवत नाही. म्हणून हा पत्रप्रपंच. तुम्ही हे पत्र प्रकाशित कराल की नाही मला माहीत नाही, वाचल्यानंतर मी काळ्या यादीत टाकलो जाईन का, माझं सदस्यत्व अबाधित राहिल का - ठाऊक नाही. तुम्ही हे पत्र मनोगतावर प्रकाशित न केल्यास ते जालावर इतरत्र ,उदाहरणार्थ ब्लॉगवर प्रकाशित जरूर केलं जाऊ शकतं व इतरांना त्याचा दुवा कळवला जाऊ शकतो शकतो . पण ते महत्त्वाचं नाही, उद्देश तो नाहीये. हे पत्र तुम्ही वाचणं व त्यावर थंड डोक्याने, गंभीरपणे विचार करणं आवश्यक आहे. अधिक काय लिहू?



क. लो. अ. ,
आपला,
मिलिंद फणसे

1 comment:

  1. उत्कृष्ट पत्र ! सहमत !

    ReplyDelete