Sunday, September 23, 2007

मराठी जालचावड्या - काही स्फुट विचार

१) स्थापन करण्यामागची कारणे

मराठीशी संबंधित कारणे
  • मराठी भाषेवरील प्रेम - "मोडेन पण वाकणार नाही" छाप भांडकुदळ मराठी भाषिकांवर प्रेम करण्यापेक्षा मराठी भाषा या संकल्पनेवर प्रेम करणे तुलनेने सोपे असल्यामुळे जालचावडी स्थापन करणे. (इथे समस्त मराठी भाषिक हा अर्थ अभिप्रेत आहे. एका किंवा निधड्या छातीचे असल्यास एकाहून अधिक विशिष्ट मराठी भाषिकांवर प्रेम करणाऱ्यांची संख्या मोजण्यापलिकडे आहे याची सदरहु लेखकास जाणीव आहे.)
  • मराठी माणसांच्या अभिव्यक्तिला वाव देण्याची इच्छा असणे.
  • जालावर मराठी माणसांच्या गाठी-भेटींची सोय करणे -> "महाराष्ट्र धर्म वाढवावा"

रिकामपणचे उद्योग, कंडशमन, इत्यादी

फावला वेळ, उत्तम तांत्रिक ज्ञान व आर्थिक पाठबळ हाती असल्यास मायबोलीचे ऋण फेडण्याचा हा उत्तम मार्ग आहे.

वेगळी चूल


याची कारणे सुनेने वेगळी चूल मांडताना दिलेल्या कारणांशी साधर्म्य राखून असतात.
  • आधीच्या चावडीच्या मालकाशी मतभेद
अ) तात्त्विक - व्यक्तिस्वातंत्र्य, अभिव्यक्तिस्वातंत्र्य, मालकाने मर्जीतल्या सभासदांना नियमातून दिलेली सूट, इत्यादी
आ) वैयक्तिक

इ) सात्विक ( याचे उदाहरण कोणास आढळल्यास कळवावे. )

  • सभासदांतील गटबाजी
अ) "उष्ट्राणाम् लग्नवेलायाम् गीतम् गायन्ति गर्दभाः।
परस्परं प्रशंसन्ति अहो रूपम् अहो ध्वनि :॥
"
आ) "
मेरी भैंस को डंडा क्यों मारा !?"
  • "जानी, वो सेर हैं तो हम सव्वा-सेर हैं !"
विशिष्ट विषय

सर्वसामान्य चावड्यांमध्ये आपल्या पसंतीचा विशिष्ट विषय नीट किंवा सविस्तर हाताळला जात नसल्याची भावना. असे वाटू लागल्यास त्या विषयास वाहिलेली खास मराठी जालचावडी निर्मिली जाते.

स्मारक

दिवंगत महनीय व्यक्तीचे स्मारक म्हणून. शहाजहानने नाही का ताज महाल बांधला ?

२)माणसे जालचावडीचे सभासदत्व का घेतात ?

  • 'नामांकित' - हार-तुरे, सन्मान मिळाल्यामुळे. चावडी-मालक इतर चावड्यांवरील नामांकितांना अगत्यपूर्वक, अजीजीने बोलावत असेल तर ते नाही कशाला म्हणतील? राजकारणी नाही दिवसाला दहा सभा-समारंभांना जातात ?
  • सर्वसामान्य वाचनमात्र सभासद
अ) नव्या चावडीवर काय वेगळे आहे ते पाहण्यासाठी
आ) नव्या चावडीवर
कोण वेगळे आहे ते पाहण्यासाठी
  • लेखक - नव्या वाचकांच्या शोधार्थ
  • वाचक - नव्या लेखकांच्या शोधार्थ
  • हाडाचे टीकाकार - नव्या हाडांच्या शोधार्थ
  • विडंबक - नव्या बकऱ्यांच्या शोधार्थ
  • इतर
अ) भांडायला नव्या आखाड्याच्या शोधार्थ
आ) कोंबड्यांच्या नव्या झुंजी बघायला

इ) काड्या लावायला


सभासद चावडी सोडून का जातात

याची बरीचशी कारणं 'वेगळी चूल' प्रमाणे आहेत.
  • चावडीमालकाशी मतभेद
अ) तात्त्विक (टीप : काल 'अ' चावडीचा सभासद असणाऱ्याने तात्त्विक कारणास्तव ती सोडून 'ब' चावडी काढली की 'ब' चावडीचे सभासद दोन दिवसात त्याच तात्त्विक कारणांस्तव 'ब' चावडी सोडू लागतात)
आ)
वैयक्तिक
इ) सवयीचा परिणाम - असते एखाद्याला भांडण्याची सवय. काय करणार?
  • इतर सभासदांशी तीव्र मतभेद (किती वेळा 'भांडण' शब्द वापरायचा?)
अ) गटबाजी, कंपूबाजी (टीप : आपला समविचारी मित्रांचा गट, इतरांचा कंपू. उपटीप : आपली ती बाबी, त्यांची ती कार्टी.)
आ)
आपल्या लेखनावर, पक्षी आपल्यावर, लांडग्यांच्या कळपाचे वारंवार हल्ले
इ) आपल्या 'दर्जेदार' लेखनाकडे 'दुर्लक्ष', कळपातील लेखकांवर स्तुतीसुमने.
ई)
टीका
आपण इतरांवर केलेली : यावर टीकाविषय का चिडतात ते कळत नाही कारण ही नेहमी समतोल, वस्तुनिष्ठ व लेखकाच्या भल्यासाठीच असते. प्रसंगी परखड व सडेतोड असली तरी पातळी सोडून कधीही नसते.
इतरांनी आपल्यावर केलेली
-सौम्य : ही नेहमी बिनबुडाची असून टीकाकाराच्या अल्पमतित्वाची साक्ष देते.
-कडक : ही आकसापोटी केलेली, व्यक्तिगत व 'कमरेखालील वार' यात मोडणारी असते.
उ)विभागीय भाषाशैलीविषयी अज्ञान :
काही सभासद महाराष्ट्राच्या ज्या भागातून येतात तिथे (त्यांच्या मते) माता-भगिनींवरून दिलेल्या शिव्या म्हणे अल्पविराम, स्वल्पविरामाप्रमाणे संभाषणात वापरल्या जातात. जालावर लिहिताना हे सभासद हीच भाषा जालचावडीवर अत्यंत निरागसपणे वापरतात. इतर सभासद त्यास आक्षेपार्ह मानून चावडी सोडून गेले तर त्यात यांचा काय दोष ? "आम्ही आहोत हे असे आहोत. ज्यांना आमची भाषा पसंत नसेल ते **चे गेले ***च्या **त!"
  • कंटाळा - कविवर्य विंदा करंदीकरांनी म्हटलेच आहे
"...तीच गाणीं, तेच तराणे;
तेच मूर्ख, तेच शहाणे;
तेंच तें ! तेंच तें !
...
पडद्यावरच्या भूतचेष्टा:
शिळा शोक, बुळा विनोद;
भ्रष्ट कथा, नष्ट बोध;..."

तात्पर्य

"काय भुललासी वरलिया रंगा ?"
जरा वरचा ले-आऊटचा रंग खरवडला की साऱ्या चावड्या सारख्याच. पारातील पिंपळाचे झाड वेगळे असले तरी जमलेले गावकरी तेच, तिखट-मीठ लावलेल्या चर्चा त्याच, हजाम तेच आणि भादरून घेणारेही तेच ! पिंपळावर बसलेले कावळेही तेच आणि मुंजेही तेच !पुन्हा विंदांच्याच शब्दात सांगायचे तर
"नरम मसाला, गरम मसाला;
तोच तोच भाजीपाला;
तीच तीच खवट चटणी;
तेंच तेंच आंबट सार;
...सकाळपासून रात्रीपर्यंत
तेंच तें ! तेंच तें !

3 comments:

  1. Anonymous8:57 AM

    ha ha lo po. ashakya lihile aahet. chalu dyat!

    ReplyDelete
  2. Anonymous7:38 AM

    Just terrific.

    Vinayak the Mailman

    ReplyDelete