माय्क्रोसॊफ़्टची या क्षेत्रातील वाढत चाललेली मक्तेदारी ही एक निश्चितपणे धोकादायक गोष्ट आहे. कोणीतरी म्हटलेले आहे, "The only thing worse than a public sector monopoly is a private sector monopoly." आपण सारे वैयक्तिक संगणक (PC) वापरणारे मेंढ्यांप्रमाणे गेट्स्च्या मागे मागे जात राहतोय. का, तर केवळ इतर सारे हेच करतायत म्हणून! त्यात तो दर दोन-तीन वर्षांनी अपग्रेडच्या नावावर 'खिडक्यां"ची आणि "कार्यालय"ची नवी आवृत्ती काढणार, त्या बहुतेक जुन्या संगणकांवर चालणार नाहीत म्हणून लोकांना नवा संगणक घेण्याचाही भुर्दंड.
ही मक्तेदारी मोडून काढण्याचा उपाय आहे मुक्त स्रोत आज्ञाप्रणालींचा वापर करणे. याचे अनेक फायदे आहेत :
- या आज्ञाप्रणाली मुक्त स्रोत असल्यामुळे संगणक क्षेत्रातील कोणीही तज्ञ त्यांची आज्ञावली तपासून बघू शकतो, त्यात कुठल्याही प्रकारचे स्पायवेअर दडलेले नाही याची खातरजमा करून घेऊ शकतो.
- यात जगभरातले लाखो प्रोग्रॆमर्स बदल करून बघू शकतात, जे बदल फायद्याचे ठरतील ते महाजालावरील मुक्त स्रोत फोराद्वारे सर्वांपर्यंत पोचवू शकतात.
- या आज्ञाप्रणालींची किंमत अत्यंत आकर्षक असते - फुकट !
- अनधिकृत आज्ञाप्रणाली वापरण्यातून निर्माण होणारे कायदेशीर धोके उद्भवत नाहीत.
- एका मक्तेदारीस आव्हान देण्यात आपला खारीचा वाटा उचलल्याचे समाधान मिळते.
मी वापरत असलेल्या व मला आवडलेल्या काही आज्ञाप्रणालींची यादी.
- Firefox : मुक्त स्रोत. निर्विवादपणे सर्वोत्तम भ्रमणक (browser). IE याच्या आसपासही पोहोचत नाही. आधीच सरस, त्यात उपलब्ध शेकडो एक्स्टेन्शन्स्मुळे आपल्याला हवा तसा करता येतो.
- Thunderbird : मुक्त स्रोत इ-मेल क्लायंट. Outlook Express ला उत्तम पर्याय. हा आपण वेब मेलसाठीही वापरू शकतो, म्हणजे GMail, Yahoo Mail, Hotmail पाठवण्यासाठी व वाचण्यासाठीही वापरू शकतो. त्याशिवाय तो स्वतंत्र इ-मेल क्लायंट आहेच.
- Open Office : मुक्त स्रोत. मायक्रोसॊफ्ट ऒफिस (कार्यालय) ऐवजी हे वापरा. गरज पडल्यास यात निर्मिलेल्या फाईल्स् MS Office फॊर्मॆटमध्ये सेव करता येतात. त्यामुळे "कार्यालय" वापरणाऱ्यांबरोबर काम करताना/फाईल्स् देता-घेताना अडचण येत नाही. मग ते महागडं "कार्यालय" हवय कशाला?
- GnuCash : मुक्त स्रोत. MS Money आणि Quickenला पर्याय.
- Ubuntu : मुक्त स्रोत GUI Linux OS. यांच्या संकेतस्थळावर आपला नाव-पत्ता नोंदवल्यास ते युरोपहून उबुन्टू CD पोस्टाने घरपोच पाठवतात - तीही फुकट! हे मी केवळ वाचून नाही तर स्वानुभवावरून सांगतोय. मला मिळालेली आहे. अर्थात ज्यांना ७०० मेगाबाईट डाऊनलोड करायचे असेल ते तसे करू शकतात. (माझी ४० जीबीची हार्ड डिस्क जवळ जवळ पूर्ण भरलेली आहे. नजिकच्या भविष्यकाळात नवी घालण्याचा बेत आहे. तसे केल्यानंतर लगेच उबुन्टू इन्स्टॊल करून दुहेरी बूट सिस्टिम करीन. एकदा उबुन्टूची नीट सवय झाली की "खिडक्यां"ना अखेरचा जय महाराष्ट्र करण्याचा विचार आहे.)
- Nvu : मुक्त स्रोत. WYSIWYG हटमल संपादक व संकेतस्थळ व्यवस्थापक. MS Front Page किंवा Dreamweaver ऐवजी वापरावे. या दोन व्यावसायिक प्रोप्रायटरी प्रणालींइतक्या सुविधा नसल्या तरी वैयक्तिक वापरासाठी उपयुक्त.
- Scribus : मुक्त स्रोत. डेस्क-टॊप प्रकाशन प्रणाली. मात्र यात अजूनही भारतीय भाषा अंतर्भूत नाहीत.
- Pidgin : मुक्त स्रोत. तातडीचा निरोप्या (Instant Messenger). पिजिन MSN Messenger, Yahoo! Messenger, Google Talk,AIM, ICQ, IRC, इत्यादींबरोबर काम करतो. हा वापरून आपण एकाच वेळी अनेक IM नेटवर्क्स्वर अनेक खात्यांना लॊग-इन करू शकता.
- Media Player Classic (MPC): मुक्त स्रोत मिडिया प्लेयर. यात DVD प्लेयर अंतर्भूत आहे. Windows Media Playerला लहान पण सशक्त पर्याय. Real Alternative व Quick Time Alternative MPC बरोबर इन्स्टॊल केले तर MPC RealMedia फाईल्स् व QuickTime फाईल्स्ही वाजवू शकतो, आपल्या संगणकावर Real Player व Quick Time Player हे वेगळे अवाढव्य व जाहिराती ढकलणारे प्लेयर इन्स्टॊल करण्याची गरज उरत नाही.
- GIMP : मुक्त स्रोत इमेज मॆनिपुलेशन प्रणाली. Adobe Photoshop ला पर्याय.
- Audacity : मुक्त स्रोत ध्वनीसंपादक व ध्वनीलेखक. ऒडियो फाइल्स् निर्मिती व संपादनासाठी उत्तम.
- ClamWin Antivirus : मुक्त स्रोत. Norton Anti-Virus, McAfee Anti-Virus ला पर्याय. वायरसेस शोधण्यात व काढण्यात प्रोप्रायटरी आज्ञाप्रणालींइतकाच कार्यक्षम परंतु यात रिअल-टाईम स्कॆनर नाही. फाईल निवडून स्कॆन करावी लागते. ही मर्यादा/अडचण नसणारे एक उत्तम फ्रीवेअर आहे AVG Anti-Virus Free. हे मी अनेक वर्षं विनातक्रार वापरत आहे. रिअल-टाईम स्कॆनर, दररोज स्वयंचलित अपडेट, ठराविक वेळेस व दिवशी स्वयंचलित स्कॆन...आणि नॊर्टन वा मकॆफीहून खूप लहान.
- musikCube : मुक्त स्रोत म्युज़िक प्लेयर/ज्युकबॊक्स. वेगवान, खूप कमी मेमरी वापरणारा, आवाजाचा दर्जा अप्रतिम.
- EAC : फ्रीवेअर. याहून चांगला CD रिपर पैसे देऊनही मिळणार नाही !
"In an open society, who needs gates and windows ?"
No comments:
Post a Comment