तरी मी तुला सांगत होतो...
हे वाक्य आयुष्यात कधीही न उच्चारलेली - उघडपणे किंवा मनातल्या मनात - व्यक्ति तुम्ही पाहिली आहे का? अशी व्यक्ति शोधणे म्हणजे सुखी माणसाचा सदरा शोधण्यासारखे आहे. आपण सारेच सल्ले देत असतो. कधी ते लोकांनी मागीतलेले असतात, कधी अनाहूत.
नवऱ्याला ( हे सल्ले बहुधा अनाहूतच असतात!)/बायकोला/सहकाऱ्याला/मुलांना/मित्रांना/साऱ्या जगाला (हा मक्ता मात्र संतांचा आणि वर्तमानपत्रांच्या संपादकांचा) - काही ना काही तरी सल्ला, सूचना आपण देतच असतो. पण घेणारा दरवेळी त्यानुसार वागतो असे नाही. खरं सांगायचं तर बहुतेकदा विचारणाऱ्याला सल्ला नकोच असतो. त्याला हवे असते अनुमोदन. तो जे करतोय किंवा ठरवतोय ते प्राप्त परिस्थितीत कसं योग्य आहे हे त्याला तुमच्या तोंडून ऐकायचं असतं. सल्ला घेऊनही जेव्हा एखादा आपल्या सांगण्याप्रमाणे न वागता दुसरेच काहीतरी करतो तेव्हा आपला अहंकार कुठेतरी थोडासा दुखावला जातो. आणि मग जर त्याला हवे ते घडले नाही, त्याचे ईप्सित साध्य झाले नाही तर ? आपल्याला त्याच्यासाठी वाईट वाटतं, नक्कीच वाटतं, कारण तो आपलाच कोणीतरी असतो. परंतु आत कुठेतरी आपण किंचित का होईना,सुखावून जातो हे खरं नाही का? 'ऐकलं नाहीस ना माझं, आता बघ काय झालं ते. तरी मी तुला सांगत होतो...' ही वाक्यं अशावेळी ९९ % माणसांच्या ओठावर येतात. काही त्यांना रोखून धरतात, काही सरळ बोलून मोकळे होतात.जे शब्दात बोलत नाहीत त्यांच्या चेहऱ्यावरील भाव पुरेसे बोलके असतात. कोणीतरी म्हटलंच आहे :"The face is the mirror of the soul." (इंग्रजी quotation टाकल्याने कसं वजन येतं, नाही, लेखनाला ? आपल्याला 'vernie' म्हणून हिणवणाऱ्या आपल्याच देहाने देशी परंतु स्वप्नरंजनाने विदेशी असलेल्या बंधु-भगिनींनाही आपली दखल घ्यावी लागते. एव्हढे विषयांतर पुरे.) मी संत नसल्याने आणि होण्याची अजिबात शक्यता नसल्याने अनेकांना अनेकदा ह्या वाक्यांचा प्रसाद दिलेला आहे. कधी बोलून, बऱ्याचदा चेहऱ्यावरील भावाने. एरवी मख्खपणाबद्दल पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेला माझा चेहरा अशा प्रसंगी भलताच बोलका होतो.अर्थात दोन दिले, दोन घेतले ( खरं तर दोनशे घेतले) ह्या न्यायाने हेच टोमणे मी रोज चहुबाजूने झेलत असतोच.
हे असं का असतं ? दुसऱ्याचा दु:खात, पराभवात त्याच्याबद्दल सहानुभूती वाटतं असतानाही त्याने आपलं न ऐकल्यामुळे असं घडलं ह्याचा आपल्याला मनाच्या एका छुप्या कोपऱ्यात आनंद का होतो? समाधनाचा एक सुक्ष्मसा किडा का वळवळून जातो ?
No comments:
Post a Comment